ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचं आज वयाच्या ९२व्या वर्षी निधन झालं आहे. वृध्दापकाळाने त्यांचं निधन झाल्याची माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली. सुलोचना यांच्या निधनामुळे संपूर्ण कलासृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात सुलोचना यांनी श्रोत्यांना आपलसं केलं.

लावणी आणि सुलोचना चव्हाण असं एक अतूट नातं तयार झालं. ‘औंदा लगीन करायचं’, ‘कसं काय पाटील बरं हाय का’, ‘कळीदार कपुरी पान’, ‘खेळतांना रंग बाई होळीचा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘फड सांभाळ गं तुऱ्याला आला’, ‘मी बया पडले भिडची, ग बाई भिडची’, ‘सोळावं वरिस धोक्याचं’ या आणि इतरही सुलोचना यांच्या अनेक लावण्या आजही लोकप्रिय आहेत.

आणखी वाचा – ज्येष्ठ ‘लावणीसम्राज्ञी’ सुलोचना चव्हाण यांचं निधन

आजही सुलोचना चव्हाण यांची लोकप्रियता कायम आहे. सध्याच्या लावणी प्रकाराबाबत सुलोचना यांनी ‘लोकसत्ता’शी संवाद साधताना भाष्य केलं होतं. त्या म्हणाल्या, “आज लावणी सादर करण्यापेक्षा त्याचे प्रदर्शन अधिक प्रमाणात केले जाते. श्रोते किंवा प्रेक्षकांपर्यंत लावणी पोहोचवण्यासाठी तोकडे कपडे, अश्लील हावभाव, भडक रंगभूषा, अंगप्रदर्शन याची काहीही गरज नसते.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘शिवाजी मंदिर नाट्यगृहा’चे उद्घाटन सुलोचना यांच्या लावणी गायन कार्यक्रमाने झाले होते. तसेच ‘गेट वे ऑफ इंडिया’ येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनप्रसंगीही सुलोचना यांच्या गाण्याचा कार्यक्रम झाला असल्याचं सुलोचना यांनी सांगितलं होतं. सुलोचना यांच्या पश्चात मोठी सून प्रफुल्ल, (मोठा मुलगा जय आता या जगात नाही) व त्यांची मुलगी आरती, धाकटा मुलगा विजय, त्यांची पत्नी कविता आणि त्यांचा मुलगा अजय असा त्यांचा परिवार आहे.