Sumeet Raghavan Shares Post : मुंबई आणि नजीकच्या शहरातील रस्त्यांची झालेली दुर्दशा ही नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील मोठी अडचण ठरत आहे. अनेक ठिकाणी खड्डे, त्यामुळे वाढलेली वाहतूक कोंडी… यामुळे लोकांचा प्रवास धोकादायक ठरत आहे. त्यातच पावसामुळे तर या खड्ड्यांमुळे रस्त्यांची अवस्था आणखीनच वाईट झाली आहे.
सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक कलाकार मंडळींनासुद्धा या खराब रस्त्यांवरून प्रवास करावा लागतो. रस्त्यांच्या या खराब अवस्थेबद्दल इंडस्ट्रीमधील काही कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा रोष व्यक्त करताना दिसतात. त्यापैकीच एक अभिनेता म्हणजे सुमीत राघवन.
मराठी भाषेचा मुद्दा असो… राजकारण असो किंवा कोणताही सामाजिक प्रश्न… सुमित कायमच आपलं स्पष्ट आणि रोखठोक मत मांडताना दिसतो. अशातच त्यानं पुन्हा एकदा रस्त्यावरील खड्ड्यांबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी राज्यभरात हिंदी सक्तीचा मुद्दा चांगलाच चर्चेत आला होता, ज्याविरुद्ध सुमीतने आवाज उठवला होता. त्यानंतर नुकताच दादरच्या कबुतरखान्याचा मुद्दादेखील चांगलाच पेटला. अशातच सध्या सर्वत्र भटक्या कुत्र्यांबद्दल न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर चर्चा होताना दिसत आहे. याच सगळ्या मुद्द्यांवरून सुमीतने प्रतिक्रिया दिलीय.

सुमीतने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर Digital Innova Africa या इन्स्टाग्राम पेजवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यात रस्त्यावर पावसाचं पाणी साठू नये म्हणून तयार करण्यात आलेल्या नव्या तंत्रज्ञानाबद्दलची माहिती देण्यात आली आहे. हाच व्हिडीओ शेअर करीत सुमीतने नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख करीत म्हटलंय, “रस्त्यावरची कुत्री, कबुतरं, हिंदी सक्ती यापेक्षा आपल्या देशात आणि राज्यात ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. कृपा करून हे बघा..”
तसेच या व्हिडीओखालील कमेंट्समध्येसुद्धा सुमीतने “वर्षानुवर्षे हे सांगतोय… कृपया ऐका…” अशी कमेंट केली आहे. दरम्यान, Digital Innova Africa या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये जर्मनीमधील अभियंत्यांनी फक्त दगडाची पावडर (क्रश्ड ग्रॅनाइट) वापरून असा रस्ता तयार केला आहे, जो काही मिनिटांत पावसाचं पाणी शोषून घेत असल्याची माहिती देण्यात आली आहे.