बॉलीवूडचा सुपरस्टार गोविंदा गेल्या काही महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. गोविंदाचं लग्न सुनीता आहुजा यांच्याबरोबर झालं असून दोघांच्या लग्नाला ३८ वर्षे झाली आहेत. काही महिन्यांपूर्वी गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाची चर्चा सुरू होती. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं म्हणत गोविंदाची पत्नी सुनीता यांनी या बातम्यांचं खंडन केलं होतं. तसंच त्यांनी ट्रोल करणाऱ्यांनादेखील चांगलचं सुनावलं होतं.
गोविंदा चित्रपटांपासून दूर आहे, पण त्याची दोन्ही मुलं, मुलगा यशवर्धन आहुजा आणि मुलगी टीना बॉलीवूडमध्ये नाव कमावण्यासाठी संघर्ष करत आहेत. अलीकडेच सुनीता आहुजा यांनी मुलाखतीमध्ये मुलांच्या संघर्षांबद्दल सांगितले आहे.
गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजाही बॉलीवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज झाला आहे. हा स्टार किड लवकरच चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. पण, या पहिल्या संधीसाठी त्याला खूप संघर्ष करावा लागला, असं त्याची आई सुनीता आहुजा म्हणाल्या.
गोविंदाने मुलाला मदत केली नाही
गोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजादेखील आता चित्रपट जगात प्रवेश करत आहे. पण, इतर स्टार किड्सप्रमाणे त्याच्या वडिलांचे नाव त्याच्या कामी आले नाही. त्याने हा चित्रपट स्वतःच्या बळावर मिळवला. गोविंदा, जो त्याच्या काळातील सुपरस्टार होता, त्याने त्याचा मुलगा यशवर्धनला त्याचा पहिला चित्रपट मिळवून देण्यात मदत केली नाही. हे स्वतः सुनीता आहुजा यांनी उघड केले आहे.
झूमशी बोलताना सुनीता आहुजा म्हणाल्या की, त्यांचा मुलगा यशवर्धनला स्वतःचा पहिला चित्रपट मिळाला आहे. त्या म्हणाल्या की, गोविंदाने त्याच्या मुलांना त्यांचे करिअर घडवण्यात मदत केली नाही आणि यामागे त्याची स्वतःची काही कारणे आहेत. सुनीता म्हणाल्या, “माझी मुले सेल्फ मेड आहेत. प्रत्येकाला एक गॉडफादर असतो, पण माझ्या मुलांबाबत असे नाही, त्यांना कोणी गॉडफादर नाही, त्यांना फक्त वडील आहेत.”
यशवर्धनने दिले ८४ ऑडिशन्स…
सुनीता पुढे म्हणाल्या, “माझ्या मुलांचे वडील (गोविंदा) त्यांच्यासाठी कोणालाही फोन करत नाहीत. त्यांचे विचार वेगळे आहेत. करिअरच्या बाबतीत गोविंदाने कधीही आपल्या मुलांना पाठिंबा दिला नाही”. सुनीता पुढे म्हणतात, “माझ्या मुलाने ८४ ऑडिशन्स दिले. गोविंदाचा मुलगा असल्याने त्याला इतके ऑडिशन्स देण्याची गरज नव्हती. पण, माझा मुलगा म्हणाला ठीक आहे… तुम्ही मेहनत केली तर त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल.”
मुलगी टीनाबद्दल बोलताना सुनीता म्हणाल्या, “माझी मुलगी टीना पंजाबमध्ये एक चांगला टॉक शो होस्ट करत आहे. यशवर्धनने चित्रपट साइन केला आहे आणि तोही चांगलं काम करत आहे.”