गोविंदा आणि त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्या घटस्फोटाच्या बातम्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या. या जोडप्याने यापूर्वी घटस्फोटाच्या बातम्यांना अफवा म्हणून फेटाळून लावले होते. त्याच वेळी अलीकडेच बातमी समोर आली आहे की, सुनीता यांनी ५ डिसेंबर २०२४ रोजी वांद्रे कुटुंब न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज केला होता.
या बातमीने गोविंदा आणि सुनीता यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, आता सुनीता यांची एक मुलाखत व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्या त्यांच्या पतीबद्दल प्रेमाने बोलल्या आहेत आणि त्यांनी म्हटले आहे की, गोविंदावर त्यांच्यासारखे कोणीही प्रेम करू शकत नाही.
माझ्याइतके गोविंदावर कोणीही प्रेम करू शकत नाही : सुनीता आहुजा
खरे तर, सुनीता आहुजा यांनी अलीकडेच ईट ट्रॅव्हल रिपीटला मुलाखत दिली. त्यादरम्यान सुनीता ३८ वर्षांच्या लग्नानंतर गोविंदाबरोबरच्या त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे बोलताना दिसल्या. सुनीता आहुजा म्हणाल्या, “मला माहीत आहे की, तो कधी भुकेलेला असतो. मला माहीत आहे की, त्याला कोकची कधी गरज असते. मला माहीत आहे की, त्याला कधी अॅसिडिटी होत असते. माझ्याइतके गोविंदाला कोणीही ओळखणार नाही आणि आयुष्यात कोणीही त्याला कधीही ओळखणार नाही. कारण- मी त्याच्यावर आतून प्रेम करते. कोणी त्याच्यावर कितीही प्रेम केले तरी माझे प्रेम आतून आहे. माझ्यासारखे गोविंदावरकोणीही प्रेम करू शकत नाही.”
जेव्हा सुनीता यांना विचारण्यात आले की, त्यांना ९० च्या दशकातील गोविंदा आवडतो की, २००० च्या दशकातील तेव्हा सुनीता यांनी उत्तर दिले, “९० च्या दशकातील. मला तोच गोविंदा आवडतो. जुना गोविंदा.” हात जोडून सुनीता म्हणाल्या, “माझा पहिला गोविंदा परत ये. माझा चि-ची परत ये. माझ्याकडे ये चि-ची.”
हॉटरफ्लायने दिलेल्या वृत्तानुसार, सुनीता यांनी हिंदू विवाह कायदा, १९५५ च्या कलम १३ (१) (i), (ia) आणि (ib) अंतर्गत याचिका दाखल केली आहे. सुनीता आहुजा यांनी लग्नाच्या ३८ वर्षांनंतर त्यांना घटस्फोट का घ्यायचा आहे, याचे कारण सांगितले आहे, ज्यामध्ये त्यांनी गोविंदावर अफेअर, अत्याचार तसेच एकटे सोडल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपूर्वीच सुनीता आहुजा यांनी त्यांच्या यूट्यूब व्लॉगमध्येदेखील घटस्फोटाबाबत वक्तव्य केले होते.
सुनीता आहुजा यांनी नुकतेच यूट्यूब चॅनेल सुरू केले आहे. त्यावर त्या व्लॉग व्हिडीओ शेअर करतात, त्यापैकी एका व्हिडीओमध्ये त्यांनी त्यांच्या घटस्फोटाच्या अफवांबद्दल वक्तव्य केले होते. तसेच, घटस्फोटाबद्दल बोलताना सुनीता रडल्या होत्या.