Sushant Singh Rajput 5th Death Anniversary : १४ जून २०२० रोजी बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करत जीवन संपवलं. त्याच्या मृत्यूने चाहत्यांना जबर धक्का बसला होता. आज त्या घटनेला पाच वर्ष पूर्ण झाली आहेत. सुशांतच्या पुण्यतिथीनिमित्त त्याची बहीण श्वेता सिंह हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
श्वेताने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन भावनिक व्हिडीओ आणि अनेक फोटोंसह एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडीओंमध्ये तिने तिच्या दिवंगत भावाची आणि अभिनेत्याची आठवण काढली आणि एसएसआरचा तिच्यासाठी काय अर्थ होता हे सांगितले.
श्वेताने सांगितले की, सुशांत अजूनही आपल्या हृदयात जिवंत आहे आणि सर्वांना विनंती केली की त्याचे नाव वापरून कधीही नकारात्मकता पसरवू नका. तिने असेही म्हटले की, सीबीआयने त्यांचा अहवाल सादर केला आहे. ते या प्रकरणाला समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
श्वेताने तिच्या दिवंगत भावाची आठवण म्हणून काही जुने फोटोही शेअर केले. एका फोटोमध्ये अभिनेता त्याच्या वडिलांबरोबर वेळ घालवत होता. दुसऱ्या फोटोमध्ये श्वेता त्याच्याबरोबर सेल्फी घेत होती. तिने तिच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये व्हिडीओमध्ये म्हटल्याप्रमाणे तेच लिहिले, “आज सुशांतची पाचवी पुण्यतिथी आहे, १४ जून २०२० रोजी त्याच्या मृत्यूनंतर बरेच काही घडले आहे. आता सीबीआयने न्यायालयात अहवाल सादर केला आहे आणि आम्ही तो प्राप्त करण्याच्या प्रक्रियेत आहोत. पण, आज मी हे सांगू इच्छिते की काहीही झाले तरी हार मानू नका आणि देवावरील किंवा चांगुलपणावरील विश्वास गमावू नका.”
श्वेता सिंह कीर्ती पुढे म्हणाली, “आमचा सुशांत कोणासाठी उभा होता हे नेहमी लक्षात ठेवा… पवित्रता, जीवन आणि शिक्षणासाठी अढळ उत्साह, प्रेमाने भरलेले हृदय जे सर्वांना समान मानत होते. त्याचे हास्य आणि डोळ्यातील निरागसता कोणाचेही हृदय प्रेमाने भरू शकते. आमचा सुशांत याचसाठी उभा होता, आपण याचसाठी उभे राहिलो पाहिजे.”
‘भाऊ कुठेही गेले नाहीत…’ : श्वेता सिंह कीर्ती
श्वेता सिंह कीर्ती पुढे लिहिते, “भाऊ कुठेही गेले नाहीत, माझ्यावर विश्वास ठेवा… तो तुमच्यात, माझ्यात, आपल्या सर्वांमध्ये आहे. जेव्हा जेव्हा आपण मनापासून प्रेम करतो, जेव्हा जेव्हा आपण जीवनाबद्दल निष्पाप असतो, जेव्हा आपण अधिक शिकण्याकडे झुकतो, तेव्हा आपण त्याला जिवंत करत असतो. नकारात्मक भावना पसरवण्यासाठी कधीही भाईचे नाव वापरू नका… त्याला ते आवडणार नाही.”
श्वेता सिंह कीर्ती पुढे म्हणाली, “त्याने किती हृदयांना आणि मनांना स्पर्श केला आणि प्रभावित केले ते पाहा… त्याचा वारसा चालू राहू द्या… तुम्ही ती जळती मेणबत्ती व्हा, जी इतर मेणबत्त्या पेटवून त्याचा वारसा पुढे चालू ठेवते. एका महान व्यक्तीचा वारसा त्याच्या गेल्यानंतर नेहमीच वाढतो… तुम्हाला माहिती आहे का?
पाच वर्षांपूर्वी करोना काळात सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील राहत्या घरी गळफास घेत जीवन संपवलं. त्याच्या मृत्यूने संपूर्ण बॉलीवूड हळहळलं होतं. सुशांतने छोट्या पडद्यापासून अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. ‘केदारनाथ’, ‘दिल बेचारा’, ‘काय पो छे’, ‘छिछोरे’, ‘एम.एस.धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘शुद्ध देसी रोमान्स’ या चित्रपटांत काम करून त्याने बॉलीवूडमध्ये अगदी कमी वेळात स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं होतं.