बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुत मृत्यू प्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी विनंती सातत्याने केली जात होती. या विनंतीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. केंद्र सरकारने सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीस मान्यता दिली आहे. दरम्यान या निर्णयावर भाजपा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी प्रतिक्रिया दिली. “मी दिलेलं वचन पूर्ण केलं का?” असा प्रश्न त्यांनी देशवासीयांना विचारला. त्यांच्या या प्रश्नावर अभिनेत्री कंगना रनौतने “तुमचं वचन अद्याप पूर्ण झालेलं नाही”, असं उत्तर दिलं आहे.
The SC has been informed by the Centre that Sushant case has been handed over to CBI. Have I completed my commitment and free to go?
— Subramanian Swamy (@Swamy39) August 5, 2020
सुशांत प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी सुब्रमण्यम स्वामी प्रयत्न करत होते. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र देखील लिहिलं होतं. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आलं. सरकारने सीबीआय चौकशीस मान्यता दिली. “केंद्र सरकारने सुशांत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीची जबाबदारी सीबीआयकडे सोपवली आहे. मी माझ्या वचनाची पूर्तता केली का? आता मी फ्री आहे का?” अशा आशयाचं ट्विट करुन त्यांनी समाधान व्यक्त केलं होतं. त्यांच्या या ट्विटवर “नाही सर तुमचं काम अद्याप संपलेलं नाही. सीबीआय या प्रकरणाला जिया खान केससारखं हाताळू शकते. हा लढा अद्याप संपलेला नाही.” अशा आशयाचं ट्विट करुन कंगनाने प्रतिक्रिया दिली. तिचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
No sir @Swamy39, we need closure, CBI can also be manipulated like they did in Jiah Khan case.
You have been the spearhead of this fight but this fight is still on.#CBIforShushant
— Kangana Ranaut (@KanganaOffical) August 5, 2020
सुशांत मृत्यू प्रकरण : मुंबई पोलीस आयुक्तांनी सांगितलेले १० महत्त्वाचे मुद्दे
१. सुशांत मृत्यू प्रकरणी आतापर्यंत ५६ लोकांचे जबाब नोंदवले गेले आहेत. व्यावसायिक वैर, आर्थिक व्यवहार किंवा आरोग्य अशा सर्व मुद्द्यांवरून तपास सुरू आहे.
२. सुशांत दुभंगलेलं व्यक्तिमत्त्व (bipolar disorder) या मानसिक आजाराने त्रस्त होता आणि त्यासाठी तो उपचार घेत असल्याचं उघडकीस आलं आहे.
३. कोणत्या कारणामुळे त्याचा मृत्यू झाला हा आमच्या तपासाचा विषय आहे.
४. १६ जून रोजी सुशांतचे वडील, बहीण आणि मेहुण्याचा जबाब नोंदवला गेला.
५. त्यावेळी सुशांतच्या कुटुंबीयांनी आमच्या तपासाबद्दल कोणतीच शंका उपस्थित केली नव्हती. आमच्या तपासात काही त्रुटी असल्याची तक्रारसुद्धा त्यांनी केली नव्हती.
६. सुशांतच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांनी जबाब नोंदवलेल्या ५६ लोकांमध्ये रिया चक्रवर्तीचाही समावेश आहे.
७. रियाचा जबाब दोन वेळा नोंदवला गेला. तिला पोलीस ठाण्यातही अनेकदा बोलावलं गेलं.
८. ती आता कोठे आहे, याबाबत मी वक्तव्य करू शकत नाही.
९. बिहार पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरनुसार सुशांतच्या खात्यातून १५ कोटी रुपये काढून घेण्यात आले.
१०. सुशांतच्या खात्यात १८ कोटी रुपये होते आणि त्यापैकी साडेचार कोटी रुपये अजूनही खात्यात आहेत, असं आमच्या तपासात निदर्शनास आलं. सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये थेट पैसे ट्रान्सफर झाल्याची कोणतीही माहिती समोर आली नाही. याबाबत अजून तपास सुरू आहे.