बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येला आता दिड महिन्यांपेक्षा अधिक वेळ होऊन गेला आहे. मुंबई व बिहार पोलीस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान या प्रकरणात आता सुशांतचा मित्र सिद्धार्थ पिटाणी याने देखील उडी घेतली आहे. त्याने सुशांतचे भावोजी ओ.पी. सिंह यांच्या एका वॉट्सअॅप मेसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला आहे. या मेसेजमार्फत केलेल्या दाव्यानुसार, ओ.पी. सिंह यांनी सुशांतला त्यांच्या पत्नीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
काय लिहिलंय या मेसेजमध्ये?
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार ओ.पी. सिंह सुशांतशी संपर्क साधण्यासाठी सिद्धार्थ पिटाणीची मदत घ्यायचे. हा दावा सिद्ध करण्यासाठी सिद्धार्थने एक वॉट्सअॅप मेसेज शेअर केला आहे. हा मेसेज ओ.पी. सिंह यांनी सुशांतसाठी सिद्धार्थच्या फोनवर पाठवला होता.
“मी चंदिगढला पोहोचलो आहे. मुंबईत येण्याचं आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद. त्यामुळे मला माझ्या जुन्या मित्रांना भेटण्याची संधी मिळाली. मला आनंद आहे की तू तुझ्या करिअरचे निर्णय स्वत: घेत नाही. मी योग्य अंदाज लावला आणि माझ्या प्रवासाचं नियोजन आखलं. कृपया माझ्या पत्नीला तुझ्या समस्यांपासून दूर ठेव. तुझी संगत, वाईट सवयी आणि मिसमॅनेजमेंटचा तिला त्रास होईल. मला खात्री करुन घ्यायची आहे की माझ्या पत्नीला त्रास होणार नाही, कारण ती खूप चांगली आहे.” अशा आशयाचा हा मेसेज आहे.
या मेसेजचे स्क्रिनशॉट सिद्धार्थने मुंबई पोलिसांकडे देखील सुपुर्त केले आहेत. सुशांतचे कुटुंबीय त्याच्या सवयींमुळे नाराज होते, असाही दावा त्याने केला आहे. दरम्यान या मेसेजचे स्क्रिनशॉट सोशल मीडियावरदेखील व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या मेसेजमुळे सुशांत मृत्यू प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.