अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या करुन आता बराच कालावधी लोटला आहे. मात्र अद्यापही त्याच्या आत्महत्येमागील गूढ कायम आहे. काहींच्या मते नैराश्यात येऊ, तर काहींच्या मते बॉलिवूडमधील घराणेशाहीला कंटाळून त्याने आत्महत्या केली. याप्रकरणी सध्या पोलीस तपास सुरु असून सुशांतच्या चाहत्यांनी आणि कलाविश्वातील काही कलाकारांनी याप्रकरणी सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु, या काळात सुशांतच्या घरातल्यांनीही एकदाही सीबीआय चौकशीची मागणी न केल्याचं पाहायला मिळालं. मात्र, अद्यापही त्यांनी ही मागणी का केली नाही हे समोर आलं आहे.
सुशांतचं निधन झाल्यानंतर त्याची बहीण श्वेता सिंह किर्ती सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक वेळा सुशांतविषयीच्या काही पोस्ट शेअर करत असते. यात अनेक वेळा चाहते तिला सुशांतविषयी त्याच्या आत्महत्येविषयी प्रश्न विचारत असतात. यामध्येच सुशांतच्या एका चाहत्याने ‘सुशांतचे कुटुंबीय सीबीआय चौकशीची मागणी का करत नाहीत?’, असा प्रश्न विचारला. त्यावर श्वेताने ट्विटरच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे.
“आम्ही मुंबई पोलिसांचा तपास पूर्ण होण्याची आणि रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहोत”, असं उत्तर श्वेताने दिलं. तिच्या या उत्तरावर अनेकांनी लाइक्स आणि कमेंट केली आहे.
दरम्यान, मुंबई पोलिसांकडून तपास पूर्ण होण्याची वाट सुशांतचे कुटुंबीय करत असल्यामुळे अद्याप त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केलेली नाही हे श्वेताने स्पष्ट केलं आहे. परंतु, जर सुशांतच्या कुटुंबीयांनी सीबीआय चौकशीची मागणी केली तर चाहते त्यांना पाठिंबा देतील असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे.