अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने १४ जून रोजी मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या आत्महत्येमुळे त्याच्या चाहत्यांबरोबरच बॉलिवडूलाही मोठा धक्का बसला आहे. सुशांतने असे टोकाचे पाऊल का उचलले यासंदर्भात कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नाही. मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून सुशांतच्या जवळच्या व्यक्तींची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. गुरुवारी वांद्रे पोलिसांनी याच प्रकरणात सुशांतची जवळची मैत्रिण तब्बल ११ तास रिया चक्रवर्तीची चौकशी केली व तिचा कबुली जबाब नोंदवून घेतला आहे. रिया चक्रवर्ती सुशांत सिंह राजपूतची जवळची मैत्रीण होती. मात्र आता या चौकशीदरम्यान आत्महत्येपूर्वी काही दिवसांआधीच दोघांमध्ये भांडण झाल्याची माहिती रियाने दिल्याचे पिंकव्हिलाने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.

मुंबई पोलिसांनी सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी दहा दिवसांमध्ये म्हणजेच ४ जूनपासून ज्या ज्या लोकांची भेट घेतली त्या लोकांची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये सुशांतची कथित प्रेयसी रिया हिचाही समावेश आहे. रियाच्या चौकशीदरम्यान तिला सुशांतसोबतच्या नातेसंबंधांबद्दल पोलिसांनी प्रश्न विचारल्याचे पिंकव्हीलाने म्हटलं आहे. या वृत्तानुसार सुशांत आणि रियामध्ये सुशांतच्या घरी राहणाऱ्या सिद्धार्थ पटाणी या मित्रावरुन मोठा वाद झाला होता. सुशांतचा फ्लॅटमेट असणाऱ्या सिदार्थला रियाने घर सोडून जाण्यास सांगितलं होतं. सुशांत सिद्धार्थला घरात राहू देत असल्याबद्दल रियाने आक्षेप नोंदवला होता. मात्र या वादानंतर रियानेच घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला मात्र त्याआधी तिने सुशांतच्या बहिणीला त्याच्या सोबत येऊन राहण्यास सांगितलं. मात्र या भांडणानंतर काही दिवसांमध्येच सुशांतने आत्महत्या केल्यामुळे सुशांतच्या घरच्यांनी रियापासून लांब राहणचं पसंत केलं असल्याचेही वृत्तामध्ये नमूद केलं आहे.

नक्की वाचा >> “त्याला आवाज ऐकू यायचे, माणसं दिसायची… त्यामुळेच घाबरुन रिया त्याला सोडून गेली”

“सुशांतच्या मानसिक परिस्थितीबद्दल ठाऊक असतानाही तिने घर सोडून जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळी सुशांतच्या बहिणीला फोन करुन त्याच्याबरोबर राहण्यास येण्याबद्दल सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. मात्र सुशांतने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या कुटुंबाने तिच्यापासून दूर राहणंच पसंत केलं तसेच तिने सुशांतच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासंदर्भातही कुटुंबाची हरकत होती, अशी माहिती तिने पोलिसांना दिली,” असं या प्रकरणाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितल्याचे वृत्तामध्ये म्हटलं आहे. सुशांत मानसिक आजारासंदर्भातील उपचार घेत होता याबद्दलचे पुरावेही रियाने पोलिसांसमोर सादर केल्याचे या वृत्तात म्हटलं आहे.

नक्की पाहा >> Video: सुशांतच्या लाडक्या ‘फज’ला काय करावं कळेना; सुशांतला शोधत घरभर फिरतो आणि…

१५ जून रोजी संध्याकाळी ६ च्या दरम्यान सुशांतच्या पार्थिवावर विलेपार्ले येथील पवनहंस येथे असलेल्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.  तर १८ जून रोजी त्याच्या अस्थींचं पाटण्याजवळ गंगेत विसर्जन करण्यात आलं. पोलीस सध्या सुशांतच्या आत्महत्येच्या प्रकरणाचा तपास करत आहेत.