Sushil Kedia Apology : मुंबईतील व्यावसायिक सुशील केडिया यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना आव्हान देत मराठी बोलणार नसल्याचं म्हटलं होतं. तसंच काही वृत्तवाहिन्यांना प्रतिक्रिया देत मराठी शिकणार नसल्याच्या संदर्भात केडिया यांनी विधान केलं होतं. एवढंच नाही तर राज ठाकरे आणि एक दहशतवादी यांच्या धोरणात काय फरक आहे? असा थेट सवाल सुशील केडिया यांनी उपस्थित केला होता.
यानंतर सुशील केडिया यांच्या विरोधात मनसेच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मनसे कार्यकर्त्यांनी दगडफेक करत सुशील केडियाच्या वरळीतील ऑफिसची तोडफोड केली होती. त्यानंतर मग ५ जुलै रोजी झालेल्या ठाकरे बंधुंच्या मेळाव्यानंतर सुशील यांनी त्यांचा माफीनामा जाहीर केला. सुशील केडीयांच्या या माफीनाम्यानंतर लोकप्रिय मराठी अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.
मराठी अभिनेता अभिजीत केळकरने सुशील केडीया यांच्या माफीनंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. अभिजीत हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. सोशल मीडियावर तो त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ शेअर करत असतो. त्याचबरोबर अनेकदा आजूबाजूच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीबद्दलही मत व्यक्त करत असतो. अशातच त्याने सुशील केडीया प्रकरणी पोस्ट शेअर केली आहे.
अभिजीत केळकर इन्स्टाग्राम स्टोरी

अभिनेत्याने सुशील केडीया यांच्या “माझ्या म्हणण्याचा चुकिचा अर्थ घेतला गेला. मी माझी चुक मान्य करतो आणि राज ठाकरेंची माफी मागतो. मी मराठी बोलण्याचा प्रयत्न करेन.” या वक्तव्याची पोस्ट शेअर केली आहे. यावर अभिजीतने त्याचं मत व्यक्त करत “म्हणूनच आपली लायकी असेल तेवढंच बोलावं. नाहीतर मग अशी माफी मागायला लागते” असं म्हटलंय. शिवाय त्याने या पोस्टवर हसण्याचा इमोजीही लावला आहे.
दरम्यान, अमराठी व्यावसायिकाला मारहाण केल्यानंतर सुशील केडिया यांनी एक्सवर वादग्रस्त पोस्ट केली होती. यात राज ठाकरेंचा त्यांनी एकेरी उल्लेख करत राज ठाकरे नोंद घ्या की, मागील ३० वर्षांपासून मुंबईत राहत असून मला मराठी नीट येत नाही. आता तुमच्या अती गैरवर्तनामुळे मी निश्चित केलं आहे की, जोपर्यंत तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजीचं नाटक करण्याची परवानगी मिळतेय तोपर्यंत मराठी शिकणार नाही अशी मी प्रतिज्ञा करतो. काय करायचं आहे बोल?” असं म्हटलं होतं.
त्यानंतर सुशील यांनी एक्सवर व्हिडीओ शेअर करत “राज ठाकरे यांच्याबद्दल मला नेहमीच आदर, कृतज्ञता वाटत आली आहे. मी माझी चूक मी स्विकारतो. तसेच मी आता अपेक्षा करतो की वातावरण शांत करावं” असं म्हटलं. तसंच यापुढे त्यांनी “मराठी न कळणाऱ्या काही जणांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेनंतर मी मानसिक तणावाखाली होतो. पण मला आता जाणवत आहे की, मी माझी प्रतिक्रिया मागे घ्यायला हवी” असं म्हटलं.