मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सुयश टिळक (Suyash Tilak). ‘का रे दुरावा’ या मालिकेतून रुपेरी पडद्यावर पदार्पण करणाऱ्या सुयशने आजवर अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. विविध कलाकृतींमधून त्याने साकारलेल्या सर्वच भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. नाटक, चित्रपट, वेब सीरिज व मालिका अशा मनोरंजनाच्या सर्वच माध्यमांतून त्याने आजवर अनेक भूमिका साकारीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

आपल्या अभिनयानं चर्चेत राहणारा हा अभिनेता एका आणखी क्षेत्रात सक्रिय आहे आणि हे क्षेत्र म्हणजे फोटोग्राफी. सुयश टिळक उत्तम अभिनेताच नव्हे, तर एक उत्तम छायाचित्रकारसुद्धा आहे. सुयश टिळक वन्यजीवन छायाचित्रणाचे धडे गिरवीत असून, वाइल्ड लाइफ फोटोग्राफी या आवडत्या छंदासाठी तो वेळ काढतो. सुयश टिळक वाइल्ड लाइफचे अनेक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करीत असतो. त्याच्या या फोटोंना चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळतो. अशातच त्याच्या या फोटोग्राफीची नोंद ‘लोकसत्ता’कडून घेण्यात आली आहे.

सुयशला नुकताच ‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२४’ (Loksatta Tarun Tejankit 2024) हा पुरस्कार मिळाला असून, या पुरस्काराबद्दलची खास पोस्ट त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुयशने असे म्हटले आहे, ???”आपलं काम करत जायचं फळाची अपेक्षा न ठेवता (की- “फळाची अपेक्षा न ठेवता आपलं काम करत जायचं)??? हे अनेकांनी आजवर मनात बिंबवलं आणि मी ते करत राहिलो, यापुढेही करत राहीन. लोकसत्ता वृत्तसमूहाने ‘लोकसत्ता तरुण तेजांकित २०२४’ हा पुरस्कार देऊन, आजवरच्या माझ्या अभिनयाच्या प्रवासाचा, वन्यजीवन छायाचित्रण व पर्यावरण संवर्धनाच्या कामाचा गौरव केला आणि मन भरून आलं.”

यापुढे त्याने म्हटले, “हा पुरस्कार खूप महत्त्वाचा व जबाबदारी वाढवणारा आहे. पण, हा पुरस्कार आजवर जाणते-अजाणतेपणी माझ्या व्यक्तिमत्त्वावर ज्यांनी ज्यांनी चांगले संस्कार केले, त्यांचाही आहे. माझ्या स्वप्नांवर विश्वास ठेवून, स्वतःच्या अनेक गोष्टी बाजूला ठेवून माझ्यासाठी झटणाऱ्या माझ्या आई-बाबांचा आहे. मला शाळा-महाविद्यालयापासून आजवर लाभलेल्या अनेक शिक्षकांचा आहे. माझ्यावर भरपूर प्रेम करणाऱ्या अनेक मित्र मैत्रिणींचा आहे.”

View this post on Instagram

A post shared by Suyash Tilak (@suyashtlk)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे त्याने म्हटले आहे, “माझ्या अनेक सहकलाकार व तंत्रज्ञांचाही आहे आणि हे सगळं लांबून पण निष्ठेनं बघणाऱ्या प्रेक्षकांचाही आहे. अजून बरंच काम करायचं आहे. त्यासाठीची प्रेरणा देणारा हा पुरस्कार आहे. माझ्या सर्व कामांचे मनापासून कौतुक करणाऱ्या तुम्हा सर्वांचेच मनापासून आभार” दरम्यान, सुयशने शेअर केलेल्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्सद्वारे त्याचे कौतुक केले आहे. त्याशिवाय त्याला शुभेच्छाही दिल्या आहेत.