प्रसिद्ध स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या बंगळुरुमध्ये होणाऱ्या एका स्टँडअप शो ला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. फारुकी हा वादग्रस्त व्यक्ती असल्याचे सांगत शो रद्द करण्याचे निर्देश पोलिसांनी संबंधित सभागृह मालकाला दिले आहेत. त्यामुळे तो शो रद्द करण्यात आला आहे. सतत रद्द होणारे शो बघता फारुकीने गुडबाय अशी पोस्ट करत करिअर संपल्याची घोषणा केली आहे. यानंतर स्वरा भास्कर, मोहम्मद झीशान अयुब आणि कॉमेडियन कुणाल कामरा यांच्यासह अनेकांनी त्याचे समर्थन करत ट्वीट केले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर ही कायमच वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियाच्या माध्यमातून बिनधास्तपणे सामाजिक विषयांवर तिचे मत मांडताना दिसते. नुकतंच तिने मुनव्वर फारुकीच्या पोस्टवर रिट्वीट करत त्याचे समर्थन दिले आहे. “द्वेष आणि कट्टरता नेहमी स्पष्ट, तर्कशुद्ध, शिक्षित आणि प्रतिभावान ‘इतर’ लोकांचा तिरस्कार करतात. जे व्यक्ती आपल्या ओळखीच्या पलीकडील लोकांशी जोडले जातात. मुनव्वर, उमर खालिद आणि इतरांनी कोणतीही चूक करु नका. बोलणारे मुस्लिम हे नेहमी हिंदुत्वासाठी धोक्याचे असतात, असे स्वरा भास्कर म्हणाली.

यानंतर स्वराने दुसरे ट्वीट केले आहे. यात स्वरा म्हणाली की, “हे फारच दुःखद आणि लज्जास्पद आहे की समाज म्हणून आपण या गुंडगिरीला सर्वसामान्य असल्याचे मानतो, मुनव्वर आम्हाला माफ कर,” असेही तिने यात म्हटले.

यानंतर अभिनेता मोहम्मद झीशान अयुब याने फारुकीच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे. “एक समाज म्हणून आपण पुन्हा एकदा अपयशी ठरलो आहोत. पण मुनव्वर भाऊ, तू आशा सोडू नकोस, मला तुला पुन्हा एकदा स्टेजवर बघण्याची इच्छा आहे,” असे तो म्हणाला.

नेमकं प्रकरण काय?

अनेक कट्टरतावादी संघटनांच्या विरोधानंतर रविवारी बंगळूरु येथे होणाऱ्या मुनव्वर फारुकीच्या स्टँडअप शो ला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. मुन्नवर फारुकी याचा हा शो बंगळुरुतील गुड शेफर्ड या ठिकाणी रविवारी संध्याकाळी ५ वाजता आयोजित करण्यात आला होता. मात्र फारुकी हा वादग्रस्त व्यक्ती असल्याचे सांगत शो रद्द करण्याचे निर्देश पोलिसांनी संबंधित सभागृह मालकाला दिले आहेत. त्यामुळे तो शो रद्द करण्यात आला आहे.

एका पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुनव्वर फारुकीच्या कोणत्याही शोसाठी परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे सध्या तरी तो कोणताही सार्वजनिक कार्यक्रम करणार नाही, असे स्पष्ट केले आहे. दरम्यान त्याच्या या शो ला अनेक कट्टरतावादी संघटनांनी विरोध केला होता. तसेच त्याच्या विरोधात बंगळुरू पोलीस आयुक्तांकडे तक्रारही दाखल करण्यात आली होती. यावेळी मुनव्वर फारुकीवर हिंदू देवतांचा अपमान करून धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला होता.

स्टँडअप कॉमेडियन मुनव्वर फारुकीची पोस्ट चर्चेत

दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर कॉमेडियन मुनव्वर फारुकीने ट्वीटरवर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. “द्वेष जिंकला आणि कलाकार हरला, माझं झालंय, गुडबाय आणि अन्याय” असे कॅप्शन त्याने या पोस्टला दिले आहे. यासोबत त्याने तीन पानांची एक पोस्ट शेअर केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“गेल्या दोन महिन्यात आमचे १२ शो रद्द केले आहेत. या प्रत्येक शो वेळी कार्यक्रमस्थळाची तोडफोड करणे, प्रेक्षकांना त्रास देण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. मी त्यांच्या द्वेषाचा एक भाग बनलो आहे. तर काही लोकांना हसवून मी त्यांच्या जगण्याचा आधार बनलो आहे. जर त्या तुटल्या तरच त्यांच्या इच्छा पूर्ण होतील. पण खरचं वाटतं मी एक तारा बनलो आहे. पण मला आता वाटतंय की सगळं संपलंय…. गुडबाय..,” असे त्याने यात म्हटले आहे. त्यामुळे सध्या त्याची ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.