स्वरा भास्कर कायमच तिच्या बेधडक विधानांमुळे आणि राजकीय विचारधारांमुळे चर्चेत राहते. अनेकदा स्वरा अशी विधाने करते, ज्यामुळे ती ट्रोल होते. नुकताच तिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यात ती आपला पती फहाद अहमदबरोबर दिसत आहे. यावेळी तिने केलेल्या विधानामुळे पुन्हा एकदा ती चर्चेत आली आहे.
खरंतर स्वरा भास्करचे समलैंगिकतेबद्दलचे विधान व्हायरल झाले आहे, परंतु लोकांना ते अजिबात आवडले नाही; यामुळे तिला टीकेला सामोरे जावे लागले आहे. स्क्रीनला दिलेल्या अलीकडच्या मुलाखतीत तिने म्हटले आहे, ‘आपण सगळेच खरेतर समलैंगिक आहोत. जर माणसाला त्याच्या इच्छेनुसार जगू दिलं तर प्रत्येक जण समलैंगिक असेल.’ स्वरा भास्करच्या या वक्तव्यामुळे केवळ लोकच नव्हे तर मानवी विकास आणि विचारसरणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
स्वरा भास्कर पुढे म्हणाली की, “हजारो वर्षांपासून समाजाने हेट्रोसेक्शुअलिटी (पुरुष आणि स्त्री यांचं नातं) सामान्य मानलं आहे. मानवजातीचा वंश पुढे नेण्यासाठी या संकल्पनेला आवश्यक ठरवण्यात आलं आणि तेच आदर्श मानलं गेलं.’ त्याच मुलाखतीत जेव्हा स्वरा भास्करला तिच्या क्रशबद्दल विचारण्यात आले, तेव्हा तिने अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांचे नाव घेतले. स्वराने हे विधान केले तेव्हा तिचा पती फहाद अहमदही तिच्याबरोबर होता.
स्वरा भास्करच्या या विधानाला कोणताही शास्त्रीय आधार नाही, त्यामुळे सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार ट्रोलिंग सुरू आहे. स्वरा भास्करचे हे विधान लोकांना आवडले नाही. काहींनी तिची खिल्ली उडवली तर काहींनी तिला कठोर शब्दांत फटकारले. एकाने म्हटले, ‘तिचे पूर्णपणे ब्रेनवॉश केले गेले आहे. महिलांना निवडीचा अधिकार नाही असं तिला वाटतं. ही आता सामान्य विचारांची व्यक्ती राहिलेली नाही.’ दुसऱ्याने लिहिले, ही सगळ्यांच्या वतीने का बोलतेय? मी समलैंगिक नाही, हेट्रोसेक्शुअलिटी फक्त वंशवृद्धीसाठी नाही, असं चाहत्यांनी म्हटलं आहे.
We all are bisexuals !!!
— Mohit Gulati (@desimojito) August 18, 2025
Yeh kaunse nashe hai bhai, matlab kuch bhi ??♂️???? pic.twitter.com/eAgl5AD90w
स्वरा भास्करच्या कामाबद्दल बोलायचं झालं, तर ती सध्या आपला आगामी चित्रपट ‘मिसेस फलानी’मध्ये व्यग्र आहे. याआधी ती ‘रांझणा’च्या री-रिलीजवेळी दिसली होती. या चित्रपटाच्या नव्या क्लायमॅक्समध्ये ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) चा वापर करण्यात आला होता. मात्र, दिग्दर्शक आनंद एल. राय, अभिनेते धनुष आणि इतर कलाकारांनी याला विरोध दर्शवला; त्यामुळे हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत राहिला.