scorecardresearch

“…तर त्यांच्यासाठी मालिका थांबणार नाही” मालिका सोडणाऱ्या कलाकारांबद्दल निर्मात्यांचे स्पष्ट वक्तव्य

मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी ‘तारक मेहता’ पात्राबाबत केलेले वक्तव्य चर्चेत.

“…तर त्यांच्यासाठी मालिका थांबणार नाही” मालिका सोडणाऱ्या कलाकारांबद्दल निर्मात्यांचे स्पष्ट वक्तव्य
मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी 'तारक मेहता' पात्राबाबत केलेले वक्तव्य चर्चेत.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिकांच्या यादीमधील एक नाव म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ अगदी लहान मुलांपासून ते जेष्ठ मंडळींपर्यंत सर्वचजण या कार्यक्रमाचे चाहते आहेत. गेल्या १४ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे भरभरुन मनोरंजन करताना दिसत आहे. गेले अनेक दिवस ही मालिका विविध मुद्द्यांवरुन चर्चेत आहे. त्यातील एक मुद्दा म्हणजे या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेले कलाकार सोडून जाणे. या मालिकेत तारक मेहता हे पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी काही दिवसांपूर्वी ही मालिका सोडली. त्यानतंर आता यावर मालिकेचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील प्रमुख पात्रांपैकी एक पात्र म्हणजे तारक मेहता. हे पात्र साकारणाऱ्या शैलेश लोढा यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. तारक मेहता आणि जेठालाल यांच्या मैत्रीचे तर अनेक चाहते आहेत. त्यामुळे शैलेश लोढा यांनी ही मालिका सोडल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला. गेले बरेच दिवस याबद्दल उलट सुलट चर्चा रंगल्या आहेत. नुकतंच यावर कार्यक्रमाचे निर्माते आसित कुमार मोदी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. तसेच लवकरच या मालिकेत नवीन तारक मेहता झळकणार असल्याची माहिती दिली आहे.

आणखी वाचा – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेच्या प्रेक्षकांना मोठा धक्का …

आसित कुमार मोदी यांनी ‘तारक मेहता’ पात्राचे आता काय होणार यावर स्पष्ट वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, “जसं मी याआधी देखील सांगितलं आहे, मला सर्वांना एकत्र घेऊन काम करणं आवडतं. पण काही जणांना जर असं वाटत असेल की त्यांचं हे काम करून मन भरलं आहे, त्यांनी यात खूप काही केलं आहे, आता नवीन काही करण्याची गरज आहे.”

आणखी वाचा – “तर मग शो बंद करा…” ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांवर भडकले चाहते

“त्यांना असं वाटत असेल की आमच्याकडे टॅलेंट आहे. आम्ही दुसरं काहीही करु शकतो. त्यामुळे आम्हाला फक्त ‘तारक मेहता..’मध्येच अडकून राहायच नाही, तर त्यांनी यावर परत एकदा विचार करावा. पण तरीही त्यांची मालिका सोडण्याची इच्छा असेल, तर त्यांच्यासाठी मालिका थांबणार नाही. नवीन तारक मेहता नक्की येतील. जुने तारक मेहता आले तरी आनंद आहे आणि नवे तारक मेहता आले तरी आनंद आहे. फक्त प्रेक्षकांचे मनोरंजन आणि त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य हा माझा उद्देश आहे.” असे आसित कुमार मोदी म्हणाले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन ( Manoranjan ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

ताज्या बातम्या