तृतीयपंथीयांसाठी झटणाऱ्या समाजसेविका गौरी सावंत यांच्या जीवनावर आधारित असलेली ‘ताली’ ही वेबमालिका जिओ सिनेमावर प्रदर्शित झाली आहे. ‘सखी चारचौघी’ ही एनजीओ चालवणाऱ्या गौरी सावंत या तृतीयपंथी लोकांच्या हक्कांसाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या पहिल्या तृतीयपंथी आहेत. त्यांचा बालपणापासून ते तृतीयपंथीयांसाठी लढण्यापर्यंतचा प्रवास उलगडणाऱ्या ‘ताली’ या वेबमालिकेचे दिग्दर्शन रवी जाधव यांनी केले आहे. अभिनेत्री सुष्मिता सेन हिने गौरी सावंत यांची भूमिका साकारली आहे. तर रवी जाधव यांनी पहिल्यांदाच वेबमालिकेचे दिग्दर्शन केले असून त्या निमित्ताने त्यांनी संवाद साधला.
सुरुवातीला चित्रपट करण्याचे ठरले होते..
२०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटानंतर मी एकही चरित्रपट केला नव्हता. त्यामुळे, मी चांगल्या गोष्टीच्या शोधात होतो. क्षितिज पटवर्धन या मराठीतील लेखकाची ही संकल्पना आहे. सुरुवातीला हा मराठी चित्रपट करण्याचे ठरले होते, पण नंतर निर्मात्यांनी ही कथा ऐकली तेव्हा ही गोष्ट संपूर्ण देशाला समजली पाहिजे असा आग्रह त्यांनी धरला. आणि त्यामुळे ही वेबमालिका हिंदी भाषेत करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे रवी जाधव यांनी सांगितले. चरित्रपट असो वा वेबमालिका त्यात मुख्य भूमिकेसाठी कलाकार निवड हे कायम आव्हान असते. ‘ताली’साठी गौरी सावंत यांच्या भूमिकेत अभिनेत्री सुष्मिता सेन योग्य ठरेल यावर सगळय़ांचे एकमत झाले आणि खुद्द सुष्मितानेही होकार दिला आणि आज त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय, असेही त्यांनी सांगितले.
सुष्मिता बारकाईने भूमिका करते..
जेव्हा या भूमिकेसाठी सुष्मिता सेन काम करणार हे ठरले तेव्हा मला अनेक शंका होत्या. दिलेल्या वेळेवर ती येईल का? दृश्य देण्याआधी तालीम करेल का? असे अनेक प्रश्न माझ्या मनात रुंजी घालत होते, पण जेव्हा मी तिला पहिल्यांदा भेटलो त्या दिवसापासून ती दिलेल्या वेळेवर सेटवर येत होती, अशी आठवण रवी यांनी सांगितली. ‘‘सेटवर सगळय़ांबरोबर मिळून मिसळून तिने काम केले. मात्र काम करताना ती प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने जास्त लक्ष देते. हातवारे, आवाज-प्रसंगाचे गांभीर्य या सगळय़ाचा अभ्यास करून मगच ती प्रत्यक्ष दृश्य देते. तसेच, नाटकासारखं आम्ही प्रत्येक दृश्य चित्रीकरण करण्याआधी तालीम करत होतो,’’ असे सांगतानाच तिच्यासोबत काम करणे अतिशय आनंददायी अनुभव असल्याचे रवी जाधव यांनी स्पष्ट केले. एकेका दृश्यासाठी तिने कशा प्रकारे मेहनत घेतली याबद्दल एक किस्साही त्यांनी सांगितला. ‘‘चित्रीकरण सुरू असताना सुष्मिताला १०४ ताप होता. त्या तापातही तिने पावसात दोन दिवस भिजत आंदोलनाचे एका मोठय़ा दृश्याचे चित्रीकरण पूर्ण केले,’’ अशी आठवणही त्यांनी सांगितली.
सहा महिने घेतले होकारासाठी..
एखादा चांगला कलाकार योग्य भूमिका हातात आल्यानंतर किती विचार करतो याचाही अनुभव यानिमित्ताने घेतल्याचे त्यांनी सांगितले. सुष्मिताला ‘ताली’ची संकल्पना सांगितल्यानंतर तिला ती आवडली. मात्र होकार देण्यापूर्वी तिने सहा महिन्यांचा कालावधी मागून घेतला. ज्या व्यक्तीची आपण भूमिका साकारतोय तिला आपण योग्य तो न्याय देऊ शकू का? या भूमिकेसाठी कशी तयारी करता येईल? या सगळय़ाचा विचार करण्यासाठी तिने सहा महिने घेतले आणि त्यानंतर ही भूमिका साकारण्यासाठी होकार दिला, असे रवी जाधव यांनी सांगितले.
ज्यांच्यावर ही वेबमालिका आधारित आहे त्या गौरी सावंत चित्रीकरण पाहण्यासाठी सेटवर आल्या होत्या तेव्हाचा एक अनुभव त्यांनी सांगितला. जेव्हा गौरी सावंत गणेश होत्या तेव्हा त्यांना सुंदर स्त्री बनायची इच्छा मनात होती.
आज जेव्हा आपली भूमिका विश्वसुंदरी सुष्मिता सेन करते आहे हे त्यांनी पाहिले तेव्हा त्यांना त्यांचे ते स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटले. त्यांनी आनंदाने आपली रुद्राक्षमाळ आशीर्वाद म्हणून सुष्मिताला दिली. ही रुद्राक्षमाळ वेबमालिकेत देखील पाहायला मिळते, अशी माहिती रवी जाधव यांनी दिली.
‘ताली’मधील प्रत्येक मराठी कलाकार, मालिका सगळय़ांनाच भरभरून प्रतिसाद मिळत असल्याबद्दल आनंद व्यक्त करणाऱ्या दिग्दर्शक रवी जाधव यांचा ‘मैं अटल हूँ’ हा आणखी एक चरित्रपट सध्या चर्चेत आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या आयुष्यावर आधारित हा हिंदी चित्रपट २५ डिसेंबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार असून अभिनेता पंकज त्रिपाठी यांनी यात वाजपेयी यांची भूमिका साकारली आहे.