कोणाचं नशीब कधी बदलेल काही सांगता येत नाही. नशीबाला मेहनतीची जोड दिली की असाध्यही साध्य होतं याचा प्रत्यय अभिनेत्री तमन्ना भाटीयाला आला असेल. आतापर्यंत तमन्नाच्या नावावर फ्लॉपचा डाग लागला होता. पण ‘बाहुबली’नंतर तिच्यावरचा हा डागही पुसून गेला. लवकरच तमन्ना, वाशू भगनानी यांची निर्मिती असलेल्या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातली तिची व्यक्तिरेखा आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी असणार आहे. यात ती मुक मुलीची भूमिका साकारणार आहे. पण ती फक्त मुकीच असणार असे नाही तर ती बुटकीही दाखवण्यात येणार आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल सांगताना तमन्ना म्हणाली की, ‘मला नेहमीच वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका करायला आवडतात. मुक्या मुलीची भूमिका फक्त वेगळीच आहे असे नाही तर आव्हानात्मकही आहे.’ खरे तर तमन्ना ‘क्वीन’ सिनेमाच्या तामिळ रिमेकमध्ये दिसणार होती. पण आता हा सिनेमाच गुंडाळण्यात आला आहे. त्यामुळे तमन्ना सध्या तरी तामिळ सिनेसृष्टीत क्वीन बनू शकली नाही तरी बॉलिवूडमध्ये मात्र तिला एक चांगली व्यक्तिरेखा मिळाली आहे. जे होते ते चांगल्याचसाठी याचा प्रत्यय तमन्नाला यावेळी आला असेल. आगामी सिनेमाबद्दल अधिक माहिती तिने दिली नसली तरी ‘तुतक तुतक तुतिया’ या सिनेमानंतर ती पुन्हा एकदा प्रभू देवासोबत काम करणार असल्याचे तिने सांगितले.

तमन्नाचा बहुप्रतिक्षीत ‘बाहुबली २’ हा सिनेमा येत्या २८ एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. राजामौली दिग्दर्शित या सिनेमात तमन्नासोबत प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी, सत्यराज यांच्या प्रमुख भूमिका आहेत. बाहुबलीच्या या भागीत कटप्पाने बाहुबलीला का मारले, याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.