अभिनेत्री तमन्ना भाटिया भारतातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. बॉलीवूडसह दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम करीत तिने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय.
दरम्यान, काही महिन्यांपासून ती तिच्या लव्ह लाईफमुळेही चर्चेत राहिल्याचे पाहायला मिळाले होते. अभिनेत्री तमन्ना भाटियाने अलीकडेच एका खास संभाषणात तिच्या चित्रपट आणि गाण्यांच्या निवडीमागील विचार मांडले.
तमन्नाने सांगितले की, जेव्हा जेव्हा ती एखादा प्रोजेक्ट निवडते तेव्हा तेव्हा ती केवळ आर्थिक उत्पन्न मिळविण्याच्या दृष्टिकोनातूनच त्याकडे पाहत नाही, तर तिच्या कामाचा लोकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला पाहिजे यावरही ती भर देते.
‘द लल्लनटॉप’ला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना म्हणाली, “माझ्यासाठी हे महत्त्वाचे आहे की, माझे गाणे, माझा अभिनय किंवा माझा चित्रपट कोणत्या ना कोणत्या प्रकारे लोकांच्या जीवनाला स्पर्श करतो. मुलाखतीदरम्यान, जेव्हा तिला विचारण्यात आले की, ती कोणत्या गाण्याबद्दल बोलत आहे, तेव्हा तमन्ना हसली आणि म्हणाली, “मी ‘स्त्री २’मधील ‘आज की रात’ या गाण्याबद्दल बोलत आहे.”
ती पुढे म्हणाली, “अनेक लहान मुलांच्या आई मला फोन करून सांगतात की, त्यांचे मूल ‘आज की रात’ गाणे वाजल्यावरच अन्न खातात आणि ती मुले डान्स करतात.” हे ऐकून होस्ट म्हणाला की, यामुळे आई लोकांची चिंता वाढेल की, त्यांच्या मुलांना इतक्या लहान वयात अशी गाणी का आवडतात. यावर तमन्नाने उत्तर दिले – पाहा, आईंची पहिली चिंता ही आहे की, त्यांचे मूल अन्न खात आहे की नाही. मुलांना गीत समजत नाही. त्यांना फक्त संगीत आवडते आणि जर ते संगीताने आनंदी असेल आणि अन्न खात असेल, तर ही सर्वांत मोठी गोष्ट आहे.” ‘आज की रात’ हे गाणे सोशल मीडियावर प्रेक्षकांनी खूप शेअर केले आणि मुलांपासून ते तरुणांपर्यंत ते खूप लोकप्रिय झाले.
या प्रोजेक्टमध्ये दिसणार तमन्ना
सध्या तमन्ना तिच्या ‘विवान : फोर्स ऑफ द फॉरेस्ट’ या नवीन चित्रपटाच्या तयारीत व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दीपक मिश्रा व अरुणाभ कुमार यांनी केले आहे आणि तमन्नाबरोबर अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रादेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट १५ मे २०२६ रोजी प्रदर्शित होईल.