चंदेरी दुनियेच्या झगमगत्या विश्वातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, कास्टिंग काऊच. मनोरंजन विश्वात काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींना कास्टिंग काऊचचा वाईट अनुभव आला आहे. अशातच तमिळ टेलिव्हिजन विश्वातल्या लोकप्रिय अभिनेत्रीने दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा मॅनेजर श्रेयसवर कास्टिंग काऊचचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
प्रसिद्ध तमिळ टीव्ही अभिनेत्री मान्या आनंदने नुकतंच एका मुलाखतीत सुपरस्टार धनुषचा मॅनेजने कास्टिंग काउचचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. तसंच ती इंडस्ट्रीत सुरु असणाऱ्या अशा चुकीच्या मागण्या आणि गैरवर्तनावरही बोलली आहे. धनुषच्या मॅनेजरचं नाव घेतल्याने मान्याचं वक्तव्य चांगलंच व्हायरल होत आहे.
अभिनेता धनुष सध्या आगामी ‘तेरे इश्क में’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सध्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तो व्यग्र आहे. दरम्यान, अभिनेत्री मान्या आनंदने केलेल्या दाव्यामुळेही धनुष चर्चेत आला आहे. मान्याने सांगितले की, धनुषचा मॅनेजर श्रेयसने तिला एका नवीन चित्रपटासाठी संपर्क केला आणि यासाठी तिला त्यानं ‘अॅडजस्टमेंट’ करावी लागेल असं सांगितलं.
सिनीलॉगम या मुलाखतीत मान्याने सांगितले की, “धनुषचा मॅनेजर श्रेयस अनेक दिवसांपासून अॅडजस्टमेंटबद्दल माझ्याशी बोलत होता. तो मला सिनेमात काम देण्याचं आमिष दाखवत होता आणि त्या बदल्यात चुकीची मागणी करत होता. पण, मी त्याला स्पष्ट नकार दिला. तो सतत माझ्यावर दबाव निर्माण करत होता. एकदा तर त्याने ‘धनुष सरांसाठीही करणार नाहीस का?’ असंही विचारलं.”
यानंतर मान्या सांगते की, “श्रेयसने मला धनुषची प्रोडक्शन कंपनी ‘वंडरबार’ फिल्म्सचं लोकेशनही पाठवलं आणि मला तिथे मीटिंगसाठी बोलवलं.’ यावर मान्याला विचारलं गेलं की, ‘तिने ही स्क्रिप्ट वाचली का?’ तर तिने सांगितले, “नाही, मी ती स्क्रिप्ट वाचली नाही. मी त्या चित्रपटात काम करायला नकार दिला. आम्ही कलाकार आहोत, तुम्ही आमच्याकडून काम करून घ्या, पण त्याबदल्यात काही दुसरी अपेक्षा ठेवू नये. इंडस्ट्रीमधील लोकांनी आता अशा घाणेरड्या मागण्या करणं बंद केलं पाहिजे.”
धनुष मॅनेजर इन्स्टाग्राम पोस्ट
दरम्यान, या गंभीर आरोपांवर अद्याप श्रेयस किंवा धनुषकडून कोणतीही प्रतिक्रिया किंवा अधिकृत विधान आलेले नाही. अशातच मान्याच्या या आरोपांनी आता साऊथ इंडस्ट्रीत खळबळ उडाली आहे. धनुषचे काही चाहते मान्या हे आरोप चर्चेत राहण्यासाठी करत असल्याचं म्हणत आहेत.
