‘स्वराज्य’ निर्मितीच्या पवित्र कार्यात अनेक मावळ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. शिवकालीन इतिहासाच्या पानांवर या मावळ्यांचं कर्तृत्त्व सोनेरी अक्षरात कोरलं आहे. या मावळ्यांपैकी एक नाव म्हणजेच तानाजी मालुसरे. तानाजींच्या पराक्रमाची कथा ही चित्रपटाच्या रुपात रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. ‘तानाजी : द अनसंग वॉरियर’ या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार आहे हे स्पष्ट झालं आहे. या चित्रपटातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेचा फर्स्ट लूक प्रसिद्ध करण्यात आला आहे.

तानाजी यांची भूमिका साकारणारा अभिनेता अजय देवगणनेच ट्विटवरुन एक ट्विट करत शिवाजी महाराजांचे पोस्टर शेअर केले आहे. ‘पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’ अशी ओळ ट्विट करत अजयने शिवाजी महाराजांचा चित्रपटातील लूक प्रसिद्ध केला आहे. डोक्यावर जीरेटोप, टोकदार दाढी, गळ्यात मोत्यांची माळ अशा राजेशाही थाटातील शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील फर्स्ट लूक या पोस्टरमध्ये दिसत आहे. तसेच घोड्यावर स्वार झालेले महाराज या पोस्टरमध्ये दाखवण्यात आले आहेत. शरद केळकर हा मराठमोळा अभिनेता शिवाजी महाराजांची भूमिका साकारत आहे.

शिवाजी महाराजांबरोबरच राजमाता जिजाऊंच्या भूमिकेचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. पद्मावती राव या जिजाऊंच्या भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊतने केलं आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच यातील कलाकारांविषयी उत्सुकता निर्माण झाली. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत आहे. सैफच्या भूमिकेचाही फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. त्याआधी काही दिवसांपूर्वीच तानाजी यांच्या भूमिकेतील अजयचा लूक प्रदर्शित करण्यात आला होता. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटाच्या निमित्तानं सैफ आणि अजयही तब्बल १३ वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट १० जानेवारी २०२० रोजी प्रदर्शित होणार आहे.