छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील नट्टू काका यांची भूमिका साकारणारे घनशाम नायक यांचे काल निधन झाले. गेले वर्षभरापासून ते कर्क रोगाशी झुंज देत होते, मात्र त्यांची ही झुंज अपयशी ठरली. त्यांनी वयाच्या ७८ वर्षी अखेरचा श्वास घेतला. शोमध्ये बागा आणि नट्टू काकाची जोडी सर्वांच्याच आवडीची होती. बागाची भूमिका साकारणारा अभिनेता तन्मय वेकारिया याने घनशाम यांच्या तब्येती बद्दल खुलासा केला आहे.
७८ वर्षाचे घनाशाम यांना पाणी प्यायला देखील त्रास होत असल्याचे तन्मयने एका मुलाखतीत सांगितले आहे. तो पुढे म्हणाला, “गेल्या २-३ महिन्यांनपासून घनशाम यांची प्रकृती ठीक नव्हती. मी त्यांच्या मुलाशी सतत संपर्कात असायचो, त्यावेळेस तो सांगायचा की त्यांना खूप वेदना होतं आहेत. ज्यामुळे ते खूप चिडचिडे झाले आहेत. त्यांना गिळायला सुद्धा त्रास होतं होता. एक प्रकारे देवाने त्यांना या त्रासातून सोडवले आहे. त्याच्या आत्म्याला शांती लाभो. “
घनशाम नायक आणि तन्मयने जवळ-जवळ १० वर्ष एकत्र काम केलं आहे. दोघांमधील बॉण्ड बद्दल बोलताना तन्मय पुढे म्हणाला,”घनशाम यांच्या सारखा माणूस शोधूनही सापडणार नाही. ते अतिशय सज्जन आणि साधा माणूस होते. मी कधीही त्यांना कोण बद्दल वाईट बोलताना पाहिले नाही. ते नेहमीच सकारात्मक होते आणि त्याच्या कामावर खूप प्रेम करायचे. मला वाटतं की देवाने त्याच्यासाठी काही योजना आखल्या असतील. मी आणि संपूर्ण ‘तारक मेहता..’ कुटुंब त्यांना खूप मिस करायचो.”
घनशाम यांनी ३५० हून अधिक मालिकांमध्ये काम केलं आहे. एव्हढच नव्हे तर ते अनेक लोकप्रिय चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत. मात्र ‘तारक मेहतामधील नट्टू काका ही घनशाम नायक यांची गाजलेली भूमिका होती. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण कलाविश्वातील कलाकारांकडून सोशल मीडियाद्वारे श्रद्धांजली दिली जात आहे.