3 year leap in Pinga Ga Pori Pinga: मालिकेत येणारे ट्विस्ट प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. आपल्या आवडत्या मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. आपल्याला आवडणाऱ्या पात्रांच्या आयुष्यात पुढे काय घडणार आहे, असा प्रश्न प्रेक्षकांना पडताना दिसतो.

आता ‘कलर्स मराठी’ वाहिनीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेत सतत नवीन काहीतरी घडताना दिसते. ही पाच मैत्रिणींची मालिका आहे. या मालिकेत विविध पार्श्वभूमी असलेल्या, विविध परिस्थितीचा सामना करणाऱ्या, वेगळ्या स्वभावांच्या पाच मुली एकत्र येतात, एकत्र राहतात. एकमेकांच्या आयुष्यात डोकावतात. वेळेनुसार त्यांच्यातील मैत्रीचे नाते इतके घट्ट होते की एकीवर संकट आले की इतर चारही जणी त्याला सामोरे जात त्यातून मार्ग काढतात.

मालिकेत दाखविल्याप्रमाणे, प्रेरणाने नुकतेच घरच्यांच्या विरोधात जाऊन तिला आवडणाऱ्या व्यक्तीशी लग्नगाठ बांधली आहे. वल्लरी तिचे वकील होण्याचे स्वप्न पूर्ण करत असतानाच तिची सासू इंदुमती मात्र तिला त्रास देताना दिसत आहे. ती वल्लरीच्या परीक्षेचे हॉल तिकीट इंदूकडून जाळते. वल्लरीला घरात कोंडून परीक्षेपासून थांबवण्याचा प्रयत्न करते. मात्र, वल्लरीच्या मैत्रिणी म्हणजेच पिंगा गर्ल्स एकत्र येऊन त्या प्रसंगाला सामोरे जातात.

‘पिंगा गं पोरी पिंगा’मध्ये येणार तीन वर्षांचा लीप

पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेत आता तीन वर्षांचा लीप येणार आहे. श्वेता तिच्या आयुष्यात घडणाऱ्या अनेक गोष्टींमुळे व्यग्र झाली आहे. वल्लरीचे स्वप्नं पूर्ण झाले आहे. वकील म्हणून नाव व्हावे, स्वतःचे घर असावे, आपली सगळी नाती असावीत असे तिला वाटते. पण, इंदुमती मात्र बदलेली अजूनही नाही. पैसा आला, नाव झालं पण अजूनही मुलं नाहीये म्हणून ती वल्लरीला त्रास देते. तिला वाईट बोलते. यादरम्यानच पिंगा गर्ल्समध्ये दुरावा आला आहे. घट्ट मैत्रिणी वेगळ्या झाल्या आहेत.

‘कलर्स मराठी’ वाहिनीने सोशल मीडियावर ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे. तीन वर्षांनंतर पिंगा गर्ल्सचे नेमके आयुष्य कसे असणार आहे, याची झलक यामध्ये पाहायला मिळत आहे. प्रोमोमध्ये पाहायला मिळते की, वल्लरी तिच्या नवीन घरात तिच्या पतीसह गृहप्रवेश करत आहे, त्यावेळी तिची सासू तिला बाळ नसल्याने टोमणे मारते. वल्लरीसह तिच्या दोन मैत्रिणी आहेत, पण श्वेता व मिठू दिसत नाहीत.

वल्लरी असे म्हणते की माझे स्वप्न पूर्ण झाले, पण या प्रवासातल्या मैत्रिणी आता हरवून चालणार नाही, त्यामुळे ती सगळ्यांना एकत्र आणण्याचा निर्णय घेते. पिंगा गर्ल्सचा प्रवास तीन वर्षांनंतर नव्याने सुरू होणार आहे. नात्यात आलेला दुरावा मिटवण्यासाठी त्या नव्याने सज्ज होणार आहेत.

दरम्यान, ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकेच्या रियुनियनचा भाग १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. आता या एक तासाच्या विशेष भागात नेमकं काय घडणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.