Abhishek Deshmukh Shared A Post : सध्या छोट्या पडद्यावर अनेक नवीन मालिका सुरू होत आहे. त्यापैकीच एक म्हणजे ‘लपंडाव’. त्यामध्ये अभिनेत्री कृतिका देव आणि चेतन वडनेरे मुख्य भूमिकांत आहेत. अशातच यानिमित्त कृतिकाचा नवरा व अभिनेता अभिषेक देशमुखने तिच्यासाठी पोस्ट शेअर केली आहे.
कृतिका देव हिने आजवर मराठीसह हिंदीतही अनेक वेगवेगळ्या प्रकारची आणि वेगवेळ्या माध्यमांतून कामं केली आहेत; पण ती पहिल्यांदाच मालिका करीत आहे. त्यामुळे तिच्या मालिकाविश्वातील पदार्पणानिमित्त तिच्या नवऱ्याने तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिषेक देशमुखने कृतिका देवला नवीन मालिकेनिमित्त दिल्या शुभेच्छा
‘आई कुठे काय करते’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता अभिषेक देशमुखने त्याच्या बायकोच्या नवीन मालिकेनिमित्त पोस्ट शेअर करीत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक म्हणाला, “कृतिका, नवीन मालिकेसाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा! आजपासून नवीन सुरुवात होतेय आणि ती चांगलीच होणार”.
अभिषेक पुढे म्हणाला, “अगदी लहानपणापासून तू नृत्य शिकलीस, अभिनय केलास, तुझं कलेवरचं प्रेम, श्रद्धा, आत्मीयता सिद्ध केलीस, पुढेही करशील..आयुष्यातल्या कटू आव्हानांना जिद्दीनं तोंड देत एकटीच्या बळावर तू वेगवेगळ्या माध्यमातून काम केलंस, अनेक संधी मिळाल्या, काही हुकल्या. संधी आणि संघर्षाचा हा ‘लपंडाव’ या क्षेत्रात कुणाला चुकलाय? आता टेलिव्हिजन या माध्यमात सुरुवात होत आहे. मालिकेचा हा प्रवास किती असतो हे कुणालाच ठाऊक नसतं! आणि हीच तर त्याची गंमत असते”.
बायकोबद्दल अभिषेक व्यक्त होत पुढे म्हणाला, “हेही सोपं नसतं; पण ते एन्जॉय करायचं, आपण ह्या प्रवाहाचा आनंद घ्यायचा आणि कधी नसेल मिळत, तर तो शोधायचा.. दररोज…! आजपर्यंत तू फक्त स्वतःशी स्पर्धा केलीस आणि पुढे आलीस. आताही तेच करशील ह्याची खात्री आहे.. मला तुझा अभिमान आहे. खूप खूप आदर आणि भरभरून प्रेम..”
दरम्यान, ‘लपंडाव’ मालिका आजपासून म्हणजेच सोमवार, १५ सप्टेंबरपासून सोमवर ते शनिवार दुपारी २ वाजता ‘स्टार प्रवाह’वर सुरू होत आहे. या मालिकेत अभिनेत्री कृतिका देव, चेतन वडनेरे व रूपाली भोसले महत्त्वपूर्ण भूमिकेतून झळकणार आहेत. ‘लपंडाव’ या नवीन मालिकेतून कृतिका, चेतन व रूपाली पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. त्यामुळे चेतन व कृतिका या नव्या जोडीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. तसेच ‘आई कुठे काय करते’नंतर रूपालीची या मालिकेतील भूमिका नेमकी कशी असेल हे पाहणेही रंजक ठरेल.