Aai Kuthe Kay Karte Fame Actor Post : देशभरात मोठ्या आनंदात आणि उत्साहात नवरात्रीचा उत्सव साजरा केला जात आहे. अनेक कर्तृत्ववान महिलांचा सन्मान केला जात आहे. या नवरात्रीनिमित्त अनेक जण त्यांच्या आयुष्यातील नवदुर्गांचं महत्त्व सांगत आहेत. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेत्यानंसुद्धा त्याच्या आयुष्यातील नवदुर्गांसाठी पोस्ट शेअर केल्या आहेत.
अभिनेता सुमंत ठाकरे नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून त्याच्या आयुष्यातील नवदुर्गांसाठी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करीत आहे. सुमंत ठाकरे हा अभिनेता आई कुठे काय करते या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आला. आई कुठे काय करते या मालिकेत त्याने अनिश ही भूमिका साकारली होती. अभिनयाद्वारे चर्चेत राहणारा हा अभिनेता सोशल मीडियावरसुद्धा तितकाच सक्रिय असतो.
अशातच त्याने नवरात्रीमधील नवदुर्गा म्हणून अभिनेत्री अनिता दातेसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुमंत अनितासाठी म्हणतो, “माझं असं पक्क मत आहे की, जर अनिता १९ व्या शतकात जन्माला आली असती, तर ती एक महत्त्वाची आणि जग बदलून टाकणारी क्रांती तिने केली असती. तिच्यासारखी कधीही न बुजणारी, खंबीर, प्रेमळ, अभ्यासू, सुजाण, हुशार व सुंदर मुलगी मी क्वचितच बघितली असेन.”
त्यानंतर सुमंत म्हणतो, “अनिता काहीही करू शकते. उद्या जर मी तिला म्हटलं की, कोडिंग कर आणि माझ्या कामात मदत कर… तर ती तेही अगदी सहज करील. अभिनय क्षेत्रात फार कमी लोक अभिनयाचं शास्त्रीय आणि तांत्रिक शिक्षण घेऊन येतात. अनिता त्यातली आहे आणि तिची अभिनयाची ताकद आपण वारंवार बघतो. याचं मुख्य कारण मला ज्या पद्धतीनं ती गोष्टींना भिडते हे वाटतं.”
त्यानंतर सुमंत सांगतो, “जिवलग ओंकारमुळे अनिता आणि माझी मैत्री झाली. मैत्री झाल्यापासून अनितानं मला कायम एक वेगळा दृष्टिकोन दिलाय. गोष्टी समजून घेण्याची आणि त्यात वेगळं काहीतरी बघण्याचा तिचा गुण मला थोडा जरी आत्मसात करता आला, तर आयुष्य बऱ्यापैकी मार्गी लागेल. नात्यांची, माणसांची, पुस्तकांची, सिनेमांची, नाटकाची आणि एकूणच जगाची इतकी समज असलेली व्यक्ती आपल्या आयुष्यात आहे, ती आपल्यावर माया करते हे किती सुखावणारं आहे. मनात होणारी चलबिचल, प्रश्न, काळोखात ढकलणारे विचार हे मी अनिताजवळ बोलत असतो आणि ती ते अतिशय शांतपणे ऐकून घेते. त्यावर तिच्याकडे बोलायला असं काहीतरी असतं, ज्यामुळे ती चलबिचल, प्रश्न, विचार थांबतात.”
सुमंत ठाकरे इन्स्टाग्राम पोस्ट
पुढे सुमंत म्हणतो, “अनिता गोष्टींच्या आरपार बघते, जेव्हा जेव्हा तिची निरीक्षणं ती मला सांगते, तेव्हा असं वाटतं की, हिला हे कसं काय जमतं?, हे सगळं ही कुठून आणते? कुठलाच संकोच न ठेवता, संवाद साधू शकणारी ही मैत्रीण माझ्या आयुष्यात आहे आणि ती कायम असणार आहे, या विचारानं मी भरून पावतो.”