Aai Kuthe Kay Karte Fame Actress New Company : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी ही मालिका आणि मालिकेतील कलाकार आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. ‘आई कुठे काय करते’मधील सगळेच कलाकार सोशल मीडियावर सक्रीय असतात. सोशल मीडियाद्वारे ते त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील अनेक अपडेट्स शेअर करत असतात. अशातच मालिकेतील एका अभिनेत्रीने तिच्या आयुष्यातील एक खास बातमी शेअर केली आहे.

अभिनेत्री कौमुदी वलोकरने नुकतीच स्वत:ची कंपनी सुरू केली आहे आणि याबद्दल तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. कौमुदीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये ती असं म्हणते, “मनापासून करावं असं सगळेच म्हणतात, मन लावून करावं असंही म्हणतात… मन आणि माझं नातं जरा जास्तच घट्ट आहे. स्वप्नं मला खूप लहानपणापासून पडायची आणि ती लक्षातसुद्धा राहायची. मग दिवास्वप्नांमध्येही जगायला आवडू लागलं आणि आता… वय वाढलं तसं स्वप्नं पडणं कमी झालंय.”

यापुढे कौमुदी म्हणते, “मुद्दा असा आहे की, या इथवरच्या छोट्या-जेमतेम केलेल्या आयुष्याच्या प्रवासात, असंच पाहिलेलं एक स्वप्न पूर्ण होताना दिसतंय; मागच्या आठवड्यात स्वतःची कंपनी काढली. उशीर झाला का? किंवा तशी वेळेत सुरुवात केलीय? याची कल्पना नाही. आणि तुलना-स्पर्धा करायला मला आवडत नाही (खेळात वगळता) खेळावरून आठवलं… मला क्रिकेटर व्हायचं होतं, त्यासाठी शिकतही होते. मग डॉक्टर व्हावं असं वाटू लागलं. पण अभिनयाची ओढ निर्माण झाली आणि शाळेत असल्यापासून बराचसा वेळ हा त्यासाठी द्यायला लागले.”

यानंतर ती म्हणते, “मग आयुष्यात मानसशस्त्र आलं. हा विषय आला की, सगळ्यांनाच मनातून काहीतरी होतं. त्यात पदव्युत्तर शिक्षण केल्यावर हे सगळं आपल्यालाच तर होत नाही ना, असे अगदीच वाटून गेलं. पण हे शिकण्याचा फायदा काय होतो? तर तो खरंतर माझ्या आजूबाजूची माणसं सांगू शकतील असं मला वाटतं. कारण शेवटी आपण त्यांच्याच संगतीत राहतो.”

यानंतर आरोही म्हणते, “माझ्यासाठी सांगायचं झालं तर, दुसरी संधी जास्त दिली जाते, समजून घेतलं जातं, निदान प्रयत्न होतो आणि जाणीव थोडीशी लवकर होते. बाकी सगळं सारखं असतं. भावना आहेत, त्या तश्याच असतात. खरंतर आपण रोज छानच असतो, छान वाटतंही असतं; पण कधीतरी असं वाटतं ना – कोणी तरी असावं, जे मनाला आणि विचारांना, सरळ, सोप्पं करायला मदत करतील. कुणालाच गरज पडावी अशी इच्छा नाही, पण गरज सांगून येत नाही आणि गरज पडलीच तर मी आणि माझी टीम तुमच्याबरोबर उभे राहायला तयार आहोत.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आरोहीने सुरू केलेल्या तिच्या या कंपनीचं नाव ‘PsychEd’ असं आहे. जी मानसिक आरोग्यांबद्दलच्या काही सेवा देतील. याद्वारे लोकांना मानसिक आरोग्यांबद्दल मार्गदर्शन केलं जाईल. कौमुदीने आपल्या पतीसह ही कंपनी सुरू केली आहे. कौमुदी आणि तिचा नवरा आकाश चौकसे हे दोघे या कंपनीचे संस्थापक आहेत. याबद्दलची माहिती तिच्या ‘PsychEd’ कंपनीच्या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे देण्यात आली आहे.