Aai Kuthe Kay Karte Fame Actress Madhurani Gokhale Buys New Car : ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने जवळपास ५ वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवलं. ही मालिका टीआरपीच्या शर्यतीत सुद्धा अग्रेसर होती. गेल्यावर्षाच्या अखेरीस ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, यातील प्रत्येक पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत लोकप्रिय अभिनेत्री मधुराणी गोखले हिने प्रमुख भूमिका साकारली होती. तिने साकारलेल्या अरुंधतीच्या भूमिकेचं सर्वत्र कौतुक करण्यात आलं. आजही प्रेक्षक मधुराणीला ‘अरुंधती’ म्हणूनच ओळखतात. प्रेक्षकांच्या या लाडक्या अभिनेत्रीने नुकतीच चाहत्यांबरोबर आनंदाची बातमी शेअर केली आहे. मधुराणीने नवीन गाडी खरेदी केली आहे.
अभिनेत्रीने नवीन गाडी घेतल्याचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. तिच्या नव्या गाडीचं नाव आहे ह्युंदाई क्रेटा ( Hyundai Creta ). या व्हिडीओमध्ये मधुराणी तिच्या जवळच्या मैत्रिणींसह नवीन गाडी खरेदी केल्याचा आनंद साजरा करत असल्याचं पाहायला मिळत आहे. गाडीची पूजा करून अभिनेत्रीने संपूर्ण गाडीची झलक चाहत्यांना दाखवली आहे.
मधुराणी लिहिते, “आयुष्यातील खरा आनंद… आपली नवीन कार…नवीन ह्युंदाई क्रेटा! आपला आनंद प्रिय आणि आपल्या जवळच्या लोकांसह शेअर केल्याने तो अधिक द्विगुणित होतो. सर्वांचे खूप खूप आभार तुम्ही माझा प्रत्येक क्षण खास बनवला आहे आणि माझ्या स्वरालीला खूप प्रेम, राम कृष्ण हरी!” ‘
अभिनेत्रीने खरेदी केलेल्या नव्याकोऱ्या Hyundai Creta गाडीची एक्स-शोरूम किंमत ११.११ लाख ते २०.९२ ( टॉप व्हेरिएंट ) लाखांपर्यंत आहे. इंजिन प्रकार (पेट्रोल किंवा डिझेल) आणि ट्रान्समिशननुसार किंमती बदलतात, असं वृत्त ‘द फायनान्शियल एक्सप्रेस’ने दिलं आहे.
नेटकऱ्यांसह मराठी कलाकारांनी मधुराणीच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. दरम्यान, ‘आई कुठे काय करते’ या मालिकेनंतर आता मधुराणी नव्या कोणत्या मालिकेत झळकणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.