Star Pravah New Serial Lapandav : ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर नवनव्या मालिकांचा प्रवाह अखंड सुरु आहे. काही दिवसांपूर्वीच वाहिनीवर समृद्धी केळकरची मुख्य भूमिका असलेली ‘हळद रुसली कुंकू हसलं’ ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. ही नवीन मालिका प्रेक्षकांची मनं जिंकत असतानाच आता ‘लपंडाव’ ही नवीकोरी मालिका ‘स्टार प्रवाह’वर लवकरच सुरु होणार आहे.

‘लपंडाव’ या मालिकेबद्दल गेल्या काही दिवसांपासून प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. या नव्या मालिकेत लोकप्रिय अभिनेता चेतन वडनेरे आणि अभिनेत्री कृतिका देव प्रमुख भूमिका साकारणार आहे.

याशिवाय ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील संजना म्हणजेच लोकप्रिय अभिनेत्री रुपाली भोसले ( Rupali Bhosale ) एका छोट्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा मालिका विश्वात दमदार पुनरागमन करणार आहे. यावेळी संजना नाही तर ‘सरकार’ बनून ती पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडणार आहे. रुपाली भोसले या नव्या मालिकेत सखीच्या म्हणजेच कृतिकाच्या आईची भूमिका साकारणार आहे.

‘लपंडाव’ मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना रुपाली म्हणाली, “लपंडाव मालिकेत तेजस्विनी कामत हे पात्र मी साकारत आहे. जिला सगळे आदराने ‘सरकार’ असं म्हणतात. प्रेम आणि नात्यांपेक्षा तिच्या लेखी पैशांना सर्वात जास्त महत्त्व आहे. घरात आणि ऑफिसमध्येही सर्वत्र फक्त तेजस्विनीचं राज्य आहे. आतापर्यंत साकारलेल्या भूमिकांपेक्षा ही भूमिका नक्कीच वेगळी आणि आव्हानात्मक आहे.”

“आई कुठे काय करते मालिकेतील मी साकारलेल्या ‘संजना’ या पात्राला आणि तिच्या लूकला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. तेजस्विनी कामतही प्रेक्षकांना एकदम ग्लॅमरस अंदाजात पाहायला मिळेल. माझ्या लूकवर संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतली आहे. मी हे नवं पात्र साकारण्यासाठी प्रचंड उत्सुक आहे” अशा भावना रुपालीने नव्या मालिकेविषयी व्यक्त केल्या आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर ‘लपंडाव’ ही नवीकोरी मालिका नेमकी किती वाजता सुरू होणार? याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल. तसेच नवीन मालिका सुरू झाल्यावर कोणती जुनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.