‘आई कुठे काय करते’ या मालिकेने जवळपास पाच वर्षे छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवून प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. या मालिकेतील सगळी पात्रं आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या मालिकेत अरुंधतीला जीवाभावाने साथ देणारी देशमुखांच्या घरची मदतनीस विमल देखील प्रत्येकाच्या पसंतीस उतरली होती. विमलची भूमिका लोकप्रिय अभिनेत्री सीमा घोगळेने साकारली होती. आता सीमाची एका नव्या मालिकेत एन्ट्री झाली आहे. ती मालिका कोणती आहे जाणून घेऊयात…

‘सन मराठी’वरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. सध्या मालिकेत माईसाहेब वैदहीचा बदला घेण्यासाठी वेगवेगळे प्लॅन तयार करताना दिसत आहेत. पण तेजा कायम वैदहीच्या बाजूने खंबीर उभा राहतो. माईसाहेबांसह मालिकेत अभिनेत्री सीमा घोगळे ‘पुष्पा’ ही खलनायिकेची भूमिका साकारत आहे.

भूमिकेबद्दल सीमा घोगळे सांगते, “यापूर्वी मी बरेचदा खलनायिकेची भूमिका साकारली आहे, पण ‘पुष्पा’ भूमिकेत बऱ्याच वेगवेगळ्या छटा आहेत. त्यामुळे ही भूमिका साकारताना दडपण येतं पण दिग्दर्शकांच्या मार्गदर्शनामुळे ‘पुष्पा’ साकारणं सोपं होतंय. मला या रूपात पाहून प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया काय असतील? याकडे माझं लक्ष आहे. पुष्पा मक्तेदार घराण्यातील मोठी जाऊबाई असली तरी, घरात तिला सत्तेचा पूर्ण हक्क नाही. माईसाहेब सगळे निर्णय घेतात आणि हेच पुष्पाच्या अस्वस्थतेचं कारण आहे. सत्ता मिळवण्यासाठी ती वेगवेगळ्या पद्धती वापरते. कोणाशी गोड बोलते, तर कोणाला फसवते. तेजाला ती आपल्या मुलासारखं मानते, पण त्याचा उपयोग करून माईसाहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न करते. पुष्पा ही केवळ खलनायिका नाही, ती एक सत्तेला भुकेली बाई आहे, जी आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी कोणतीही सीमा ओलांडते. माईसाहेबांच्या सावलीत वावरणारी, पण स्वतःचं अधिराज्य निर्माण करू पाहणारी ही ‘पुष्पा’ प्रेक्षकांना खिळवून ठेवेल ही खात्री देऊ शकते.”

१५ मिनिटांत घरी पोहोचण्याचं सुख…

“माझी सन मराठीबरोबरची ही पहिली मालिका आहे. मात्र, चिन्मय मांडलेकर, विकास पाटील, विनोद लव्हेकर आणि निखिल शेठ एकंदरीतच पोतडी एंटरटेनमेंटच्या या टीमसह मी दुसऱ्यांदा काम करते आहे. या सगळ्यांमुळे मला पुष्पा ही भूमिका साकारायला मिळत आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा नाशिकमध्ये शूटिंग करण्याची संधी मिळाली. मुंबईचं ट्राफिक, धावपळ यापासून थोडं लांब नैसर्गिक वातावरणात शूटिंग करताना खूप समाधान मिळतं. कितीही तास शूटिंग केलं तरी १५ मिनिटांत घरी पोहोचणार हे सुख वेगळंच आहे. त्यामुळे काम करायला आणखी छान वाटतं.” असं सीमाने सांगितलं आहे.