Seema Ghogale On Her Divorce: ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’, ‘आई कुठे काय करते’, ‘गोठ’,’खुलता खळी खुलेना’, ‘एक होती राजकन्या’, अशा अनेक मालिकांत सीमा घोगळेने काम करत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली होती. याबरोबरच सीमा घोगळेने १४ व्यावसायिक नाटकांत काम केले आहे. आता अभिनेत्री सीमा घोगळे तिच्या वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे.
अभिनेत्रीने नुकतीच ‘राजश्री मराठी’ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने तिच्या खासगी आयुष्याबाबत वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “२०१८ ला माझे बाबा गेले, २०१९ ला माझा घटस्फोट झाला आणि २०२० ला माझ्या आईचं निधन झालं. तीन वर्षे खूप त्रासदायक होती. माझ्या घटस्फोटाबद्दल कळल्यानंतर बऱ्याच लोकांनी मदतीचा हात पुढे केला होता.”
मी जेव्हा शूटिंगसाठी बाहेर पडणार तेव्हा…
पुढे घटस्फोटानंतर मुलाची कस्टडी स्वत:कडे का घेतली नाही, यावरदेखील अभिनेत्रीने वक्तव्य केले. अभिनेत्री म्हणाली, “आता या घडीला मी सुकन्या मोने व संजय मोने यांना उत्तरदायी आहे. कारण मी त्यांना आई-वडील मानते. माझ्या आयुष्यातील तिसरी व्यक्ती माझा मुलगा आहे, कारण तो लहान असल्याने त्याला कोणी काहीही सांगू शकतं. मी जर नैराश्यामुळे काही केलं तर त्याला हे ऐकायला मिळेल की तुझ्या आईला काहीच करणं झेपत नव्हत. मग आज त्याला माझ्याविषयी वाटतं की आई स्वत:च्या पायावर उभी आहे. तिने घर घेतलं आहे. आई काहीतरी काम करते, अशी त्याच्या मनात माझी प्रतिमा आहे.”
“माझ्याकडे त्याची कस्टडी नाही कारण-मी कलाकार आहे. माझ्या ठरलेल्या वेळा नसतात. ठरलेलं उत्पन्न येत नाही. त्याचं सगळं कसं करायचं हा प्रश्न होता. मी जेव्हा शूटिंगसाठी बाहेर पडणार तेव्हा मी त्याला पाळणाघरात ठेवणार किंवा त्याला सांभाळेल असं कोणीतरी घरात ठेवणार. त्यापेक्षा तो त्याच्या आजी-आजोबांकडे आहे. त्याच्यावर चांगले संस्कार होत आहेत. त्याच्यावर ते चांगलं लक्ष देतात. आर्थिकदृष्ट्या ते खूप सक्षम आहेत.
“आज तो जे मागतो ते त्याला मिळतं. त्याला हव्या त्या क्षेत्रात करिअर करता येऊ शकतं; असं नाही की मी त्याला देऊ शकत नाही. पण, माझ्यावर मर्यादा येतात. कारण माझं उत्पन्न नियमित नाही. पैशांचं सोंग आणता येत नाही, मी अशीही अभिनेत्री नाही की मला खूप मानधन मिळतं. माझ्या शूटिंगनुसार शहरं बदलणार, त्याची शाळा, मित्रमंडळी बदलणार; त्यापेक्षा तो आता एका सुरक्षित ठिकाणी आहे. सुट्टीच्या दिवशी आम्ही भेटतो, आम्ही एकमेकांना वेळ देतो, म्हणून मी त्याची कस्टडी घेतली नाही.”
घटस्फोटानंतर मुलाची कस्टडी न घेणं हा निर्णय खूप त्रासदायक होता. मला त्यावेळी कळत नव्हतं. मला त्यावेळी सुकन्या ताई असं म्हणाल्या, “तुझं म्हणणं बरोबर आहे, तू त्याला वेळ देऊ शकणार नाहीस, तू त्याच्यावर संस्कार करू शकणार नाहीस, इतर स्त्रिया करत असतील पण कदाचित तुझ्या कामाच्या क्षेत्रामुळे तुला वेळ देता येणार नाही. फार तर लोक म्हणतील की किती वाईट आई आहे. लोक म्हणू देत, तुला माहीत आहे तू काय आहेस.”
पुढे अभिनेत्री असेही म्हणाली, आई गेल्यानंतर बहिणींबरोबर कोणताही संबंध नाही. तसेच सुकन्या मोने व संजय मोने यांना आई-वडील मानते. माझ्या प्रत्येक निर्णयात ते माझ्याबरोबर आहेत.
दरम्यान, आता आगामी काळात अभिनेत्री कोणत्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.