‘आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)फेम अभिनेत्री कौमुदी वलोकर (Kaumudi Walokar) नुकतीच लग्नबंधनात अडकली. आकाश चौकसे, असे तिच्या पतीचे नाव आहे. तिच्या लग्नाच्या अनेक विधी व कार्यक्रमांचे फोटो याआधी सोशल मीडियावर पाहायला मिळाले. मग तो हळदी समारंभ असो किंवा संगीत सोहळा, अभिनेत्रीच्या या कार्यक्रमातील या फोटोंना चाहत्यांनी कमेंट्स करीत शुभेच्छा दिल्याचे पाहायला मिळाले. अनेक कलाकारांनीदेखील त्यांच्या सोशल मीडियावर अभिनेत्रीला शुभेच्छा देताना काही फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. आता अभिनेत्रीच्या पती आकाश चौकसेने सोशल मीडियावर लग्नातील काही खास फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने त्याच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

वेळेचं गणित सांभाळणं हे सोपं…

आकाश चौकसेने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याच्या लग्नातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना त्याने कौमुदी वलोकरच्या इन्स्टाग्राम अकाउंटला टॅग केले आहे. हे फोटो शेअर करीत आकाश चौकसेने लिहिले, “लग्नसंस्कारांकडे मागे वळून बघताना मन कृतज्ञ भावनेने भरून गेले आहे. संस्कार जरी दोघांचा असला तरी पडद्यामागे शेकडो लोक नि:स्वार्थीपणे आणि उत्साहाने काम करत असतात; मग ते पालक असोत, नातेवाईक असोत, की मित्रपरिवार. कार्यक्रम उत्तम व्हावा यासाठी ते अतोनात प्रयत्न करतात. तेव्हाच इतका देखणा सोहळा उभा राहतो. संगीतच्या तालमीपासून घरातल्या छोट्या-मोठ्या गोष्टींची जुळवाजुळव, पाहुण्यांचे आदरातिथ्य, प्रचंड सामानाची खरेदी, ऐन वेळी येणाऱ्या प्रश्नांची सोडवणूक आणि असंख्य इतर गोष्टींची काळजी घेत, स्वतःची आवराआवर करून वेळेचं गणित सांभाळणं हे सोपं काम नाही. त्यात अनेक लोक एकत्र येऊन विचार करणार, तेही दोन अनोळखी कुटुंबांतले, म्हणजे गडबड-गोंधळ होणारच. त्यातून मार्ग काढत हे लग्नसंस्कार नावाचे अग्निदिव्य पार पाडण्यासाठी मदतीला आलेल्या सर्वांचे मनापासून आभार. तुमच्या सर्वांच्या प्रेमाची उतराई होऊ शकत नाही. त्या प्रेमाच्या ऋणातच राहणे उचित राहील. आपलेच- आकाश व कौमुदी”, असे लिहीत कृतज्ञता व्यक्त केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Aakash Chowkase (@aakash_chowkase)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, अभिनेत्री कौमुदी वलोकर सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. अनेकदा तिच्या आयुष्यातील काही खास क्षण ती चाहत्यांबरोबर शेअर करताना दिसते. आई कुठे काय करते या लोकप्रिय मालिकेत तिने साकारलेली आरोहीची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडली होती. या मालिकेने काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील कलाकार सातत्याने चर्चेत असल्याचे दिसते. आता कौमुदी कोणत्या नवीन प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ते पाहावे लागेल.