Madhurani Prabhulkar Reel Video: ‘आई कुठे काय करते’ ही मालिका संपून पाच महिने झाले आहेत. ३० नोव्हेंबर २०२४ला ‘स्टार प्रवाह’च्या या लोकप्रिय मालिकेने सगळ्यांचा निरोप घेतला. ‘आई कुठे काय करते’ मालिकेने पाच वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. तसंच या मालिकेने लोकप्रियतेची एक वेगळीच उंची गाठली. आज या मालिकेतील कलाकार मंडळी वेगवेगळ्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत.
‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजे अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर नाटक करत आहे. तसंच ‘स्टार प्रवाह’चा नवा कुकिंग शो ‘शिट्टी वाजली रे’मध्येही पाहायला मिळत आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिका संपल्यापासून मधुराणी सोशल मीडियावर फार सक्रिय दिसते. नेहमी नवनवीन फोटोशूट, रील व्हिडीओ चाहत्यांसाठी शेअर करत असते. नुकताच तिने एक रील व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती करायला गेली एक पण झालं भलतंच, अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
मधुराणीने रील व्हिडीओ शेअर करत लिहिलं आहे, “रिक्षात बसून एक छान रील करुया…गॉगल घालून…केस उडतील वगैरे…पण आमचं कुठलं एवढं नशीब…” व्हिडीओमध्ये मधुराणी खड्डांमुळे रील बनवू शकत नसल्याचं दिसत आहे. या रील व्हिडीओवर तिने लिहिलं की, रिक्षात बसलेय का रोलर कोस्टर राइडवर हेच कळत नाहीये…थँक्स खड्डे”
मधुराणी प्रभुलकरच्या या रील व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. “तुम्ही आणि रिक्षा…रिक्षा धन्य झाली ती”, “गडकरी, फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते विकास झाला आहे”, कृपया त्यांना पाठवा, आम्ही सामान्य जनता…”, “भारी”, अशा प्रतिक्रिया मधुराणीच्या रील व्हिडीओवर उमटल्या आहेत.
दरम्यान, मधुराणी प्रभुलकरच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ‘आई कुठे काय करते’ मालिकासंपल्यानंतर मधुराणीनी ‘आई आणि बाबा रिटायर होतं आहेत’ मालिकेत एन्ट्री झाली होती. स्वीटी आणि मकरंद लग्नात मधुराणी पाहायला मिळाली होती. त्यानंतर मधुराणी आता ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ नाटकात काम करत आहे.