Milind Gawali Shares Anecdote: मिलिंद गवळी नुकतेच ‘झापुक झुपूक’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. त्याआधी ‘आई कुठे काय करते’ आणि ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ या मालिकांतदेखील दिसले आहेत.
मिलिंद गवळी चित्रपट, मालिकांमधील त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत असतात. मात्र, सोशल मीडियावरदेखील ते सक्रिय असल्याचे दिसतात. पोस्ट शेअर करीत ते अनेक किस्से सांगतात. आता नुकतीच त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेली पोस्ट लक्ष वेधून घेत आहे.
मिलिंद गवळी यांनी लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पत्नीबरोबरचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लिहिले, “आमच्या लग्नाला आज साडेतीन दशकं पूर्ण झाली. आजही मला ही काल-परवाचीच गोष्ट वाटतेय. मी ज्या शाळेत शिकलो, ती जगप्रसिद्ध शाळा म्हणजे आमची शारदाश्रम विद्यामंदिर, दादर. त्या शाळेच्या तळमजल्यावर दत्त मंदिर आहे, त्या मंदिराच्या अंगणात आमचं लग्न लागलं.”
आम्हाला लग्नाचे सगळे विधी…
“१९९० ला माझ्या एका मित्राने कोर्टात रजिस्टर लग्न केलं होतं. संपूर्ण लग्नाचा खर्च वाचवून ते जोडपं युरोपला फिरायला गेलं होतं. ही कल्पना मला फारच भन्नाट वाटली होती. तसाही मी माणूसघाण्या होतोच. मग घरी मी सांगितलं मला नोंदणी पद्धतीने लग्न करायचं आहे. हे ऐकताच माझी आई अजिबात नाही असं म्हणाली. आपल्या नातेवाईकांचा आणि मित्रमंडळींचा गोतावळा खूप मोठा आहे, या सगळ्यांना बोलावल्याशिवाय लग्न होणार नाही, असे तिने सांगितले.”
“मी खूप समजून सांगायचा प्रयत्न केला. आईला म्हणालो की लोक लग्नाला येतात, अन्नाची नासाडी करतात, जेवणाला नावं ठेवतात, फुकट पाण्यासारखा पैसा खर्च होतो. पण, माझं कोणी ऐकायला तयार नव्हतं, दीपासुद्धा म्हणाली, विधींशिवाय कुठे लग्न होत असतं का? मला सगळ्या विधी हव्या आहेत. नाशिक-त्र्यंबकेश्वरचे गुरुजी आमचं लग्न लावायला मुंबईला आले.”
“मी गुरुजींना म्हटलं, आम्हाला लग्नाचे सगळे विधी करायचे आहेत. आमच्या लग्नाचे विधी सकाळी ५ वाजल्यापासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होते. १२ तास चाललं, लग्नाला आलेले पाहुणे मंडळी, मित्रमंडळी इतके वैतागले, कारण हे लग्न संपता संपत नव्हतं.”
“आज ३५ वर्ष मागे वळून बघतो, त्यावेळेला या लग्नाला हजर असलेली असंख्य जवळची माणसं आज आमच्यामध्ये नाहीत. त्यातली दोन महत्त्वाची माणसं म्हणजे आम्हा दोघांच्या आई. ज्यांनी हे लग्न सुखाचे व्हावं, समृद्ध व्हावं, आम्हा दोघांच्या संसाराचा गाडा सुरळीत चालावा, म्हणून भरभरून आशीर्वाद दिले होते. आज माझी आई आणि दीपाची आई दोघीही आमच्यात नाहीत.”
“त्यांच्या प्रेमामुळे, त्यांच्या ईश्वरावरील निस्सीम भक्तीमुळे, त्या दोघांच्या शुभ आशीर्वादामुळे, आमच्या संसाराचा रथ आजही धावतो आहे. जवळजवळ नऊ वर्ष आमचं लग्न ठरलं होतं. त्यात मी जेव्हा सिनेमा क्षेत्रामध्ये करिअर करणार आहे हे कळल्यावर, त्या दोघींना किती काळजी वाटली असेल याची आज मला जाणीव होते.”
“दीपाची आई म्हणजे माझी सासूबाई माझ्यासाठी पाच हजार स्वामींचे जप का करत होती, याची जाणीव मला आज होते आहे. आज ३५ वर्षे दीपाने मला भक्कम साथ दिली. आयुष्यातल्या खडतर प्रवासामध्ये कायम पाठीशी उभी राहिली. आमच्या जीवनामध्ये उन्हाळा पावसाळा हिवाळा काही असो, कायम हसऱ्या चेहऱ्याने त्याचं स्वागत केलं. ३५ वर्षांच्या माझ्या यशस्वी आणि सुखी संसाराचं सगळं श्रेय दीपाला”, असे म्हणत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पत्नीचे कौतुक केले आहे. तसेच लग्नाची आठवणदेखील सांगितली आहे.”
आता अभिनेते कोणत्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.