‘कलर्स हिंदी’ वाहिनीवर लवकरच ‘मनपसंद की शादी’ ही नवीन मालिका सुरू होणार आहे. यामध्ये अनेक मराठी कलाकार झळकणार आहेत. ही हिंदी मालिका असली तरी, यातील कुटुंब मराठी पार्श्वभूमी असल्याचं दाखवण्यात आलं आहे. अभिनेत्री ईशा सूर्यवंशी या मालिकेत प्रमुख भूमिका साकारणार आहे.

तर, ईशाच्या वडिलांची भूमिका ‘आई कुठे काय करते’ फेम लोकप्रिय अभिनेते मिलिंद गवळी साकारणार आहेत. या मालिकेबद्दल पोस्ट शेअर करत त्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

मिलिंद गवळी म्हणाले, “राजश्री प्रॉडक्शन निर्मित ‘मनपसंद की शादी’ ही हिंदी मालिका ११ ऑगस्टपासून ‘कलर्स टिव्ही’वर प्रसारित केली जाईल. या मालिकेत मी ‘राजाराम शिंदे’ ही भूमिका साकारत आहे. यापूर्वी मी जिओ हॉटस्टार व ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अनिरुद्ध देशमुख ही भूमिका साकारली होती. यावेळी माय-बाप प्रेक्षकांनी मला भरभरून प्रेम दिलं. या मालिकेने जवळपास ५ वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवून सर्वांचा निरोप घेतला.”

अभिनेते पुढे म्हणाले, “आता मी पुन्हा एकदा जिओ हॉटस्टारच्या ‘कलर्स टीव्ही’वरील ‘मनपसंद की शादी’मध्ये ‘राजाराम शिंदे’ ही अतिशय सुंदर व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सज्ज झालोय. मला खात्री आहे की, माय-बाप प्रेक्षकांनी माझ्या आधीच्या मालिकेला जे प्रेम दिलं, तेच प्रेम मला पुन्हा मिळेल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो.”

“मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो, कारण टेलिव्हिजनवर परतल्यानंतर मला चांगल्या निर्मात्यांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. सहकलाकारांच्या बाबतीतही मी खूपच भाग्यवान आहे. मला आतापर्यंत प्रतिभावान सहकलाकार मिळाले आहेत. या मालिकेत अभिनेत्री सुचित्रा बांदेकर माझ्या पत्नीची भूमिका साकारणार आहेत. मी तिच्यासह रत्नाकर मतकरी यांच्या ‘गेहरे पाणी’ मध्ये काम केलं आहे. अभिजीत केळकर, स्वाती देवल, ईशा सूर्यवंशी हे कलाकार देखील या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकतील. आमचे दिग्दर्शक शर्माजी देखील खूप चांगले आहेत. त्यांच्यामुळेच आम्हा कलाकारांमध्ये पहिल्या दिवसापासून खूप चांगलं बॉण्डिंग तयार झालं आहे.” असं मिलिंद गवळींनी सांगितलं.

शेवटी प्रेक्षकांना विनंती करत मिलिंद गवळी सांगतात, “आमच्या मालिकेचा सेट खूपच सुंदर आहे…यामध्ये विठ्ठलाचं एक भव्य मंदिर देखील तयार करण्यात आलं आहे. यामुळे सेटवर खूप सकारात्मक वातावरण असतं. राजश्री प्रॉडक्शनसह काम करण्याचं माझं अनेक वर्षांचं स्वप्न अखेर पूर्ण होत आहे. सूरज बडजात्यांसारख्या मोठ्या लोकांसह काम करण्याची संधी फारच कमी कलाकारांना मिळते. त्यामुळे मी स्वत:ला खरोखरच भाग्यवान समजतो. ११ ऑगस्टपासून रात्री १० वाजता तुम्ही आमची मालिका नक्की पाहा.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या मालिकेत मिलिंद गवळींनी नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या पत्नीची भूमिका अभिनेत्री सुचित्रा बांदेकर साकारणार आहेत. आता मालिकेतील नायिकेच्या स्वप्नातील राजकुमार तिला कधी, कसा व कुठे भेटणार हा रोमँटिक प्रवास ‘मनपसंद की शादी’ या मालिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.