Aastad Kale Video On Mumbai Pothole Issue : मुंबई आणि नजीकच्या शहरांमधील रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस अधिकच भीषण होत चालली आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यामध्ये साठलेलं पावसाचं पाणी यांमुळे वाहनचालक आणि प्रवाशांचे हाल अक्षरशः हाल होत आहेत. या खड्ड्यांबद्दल अनेक नागरिक त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. त्यावर अनेक मराठी कलाकारसुद्धा त्यांच्या प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसतात,

मराठी अभिनेता आस्ताद काळे रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत नेहमी अपडेट्स शेअर करीत असतो. या खड्ड्यांबाबत तो संबंधित मंत्र्यांना प्रश्नही विचारताना दिसतो. अशातच आस्तादने एक नवा व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमधून त्यानं खड्ड्यांबाबत पुन्हा प्रश्न विचारला आहे.

सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये आस्ताद म्हणतो, “८ सप्टेंबर २०२५ रोजी आपल्या परिवहन मंत्री काकांचा एक व्हिडीओ बघितला. कदाचित तुम्हीही बघितला असेल… ज्यात ते एका रस्त्यावर उभे आहेत आणि त्यांच्या आजूबाजूला पोलिस कर्मचारी आणि काही सरकारी कर्मचारी असल्याचं दिसतंय. समोरच्या काही लोकांना (जे त्या व्हिडीओमध्ये कोण आहेत, ते दिसत नाही) हिंदीतून सूचना देतात की, शहरातले आणि आसपासच्या हायवेवरील खड्डे बुजले पाहिजेत आणि रस्ते सपाट झाले पाहिजेत.”

त्यानंतर आस्ताद म्हणतो, “आता तो व्हिडीओ बघून तीन आठवडे झाले. १५ तारखेची मुदत संपूनही दोन आठवडे झाले आहेत आणि या रस्त्यांच्या खड्ड्यांमध्ये खूपच फरक पडला आहे. हा फरक म्हणजे रस्ते अजूनच खराब झाले आहेत. नव्याने खड्डे पडले आहेत आणि आधीच जे खड्डे होते, ते आणखी खोल झाले आहेत. त्यांच्या या व्हिडीओबद्दल मला काही शक्यता वाटतात. पहिली शक्यता म्हणजे आमच्या टेलिव्हिजन क्षेत्रात क्लोजअप लागला असेल, तेव्हा समोर पात्रं नसतात. तसेच या व्हिडीओमध्येसुद्धा काकांचा क्लोजअप घेऊन व्हिडीओ शूट केला गेला असावा.”

त्यानंतर तो म्हणतो, “दुसरी शक्यता अशी की, समोर जर कोणी कंत्राटदार, कार्यकर्ते कर्मचारी असतील, तर ते तुमचं म्हणणं ऐकत नाहीत. ते तुमच्या म्हणण्याला महत्त्व देत नाहीत काका. तिसरी शक्यता अशी की, त्यांना खरं तर रस्त्यांचं काम करायचं असेल; पण त्यांच्यापर्यंत निधीच पोहोचला नाही. मधल्या मधे कुठेतरी पैसे गायब झाले, कोणाकडे तरी पोहोचले किंवा कोणाच्या तरी व्यवसायात ते गुंतवले गेले असावेत. चौथी शक्यता अशी की, तुम्हाला काम करायचंच नाही, ‘मी मारल्यासारखं करतो, तू लागल्यासारखं कर’ या तत्त्वावर तुम्ही सगळे एकत्र येऊन गप्पा मारून व्हिडीओ केला असावा.”

त्यानंतर आस्ताद म्हणतो, “बोरिवली परिसरातील उड्डाणपुलांवरील खड्ड्यांची भीषण अवस्था झाली आहे की, आता त्या रस्त्यांवर फक्त भोकं पडायची बाकी आहेत. फार ‘विलक्षण मज्जा’ येते. त्या रस्त्यावरून ‘गाडी चालवताना मज्जा’ येते, ज्या गाडीचे आम्ही अनेक कर भरत असतो. काय आहे ना काका? रस्त्यांच्या जाळ्याचा विचार केला तर, त्यांची लांबी साधारण दोन हजार किलोमीटर आहे. त्यातले साधारण ५० किलोमीटरचे पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग असावेत. उरले १९ हजार ५०० किलोमीटर, त्यापैकी माझ्या माहितीनुसार, १२०० किलोमीटर रस्त्यांचं काँक्रीटीकरण झालं आहे. त्यावर खड्डे नाहीत, असं नाही. तरी राहतात ७०० किलोमीटर.”

पुढे आस्ताद सांगतो, “आता मुंबईतील रस्त्यांची जी अवस्था आहे, त्यानुसार, दर २० मीटरवर एक खड्डा आहे. या हिशोबाने एका किलोमीटरमध्ये ५० खड्डे… असे एकूण ३५ हजार खड्डे आहेत काका… त्यापैकी आपण सरासरी ३० हजार खड्डे धरू. हे इतके खड्डे तुम्ही सात दिवसांत भरून काढणार होतात का? हे शक्य आहे? आपल्याकडची एकूण व्यवस्था, कामाप्रतिची आस्था आणि मुंबईतील काही अडचणी बघता, हे शक्य आहे का? मुंबईमध्ये प्रचंड ट्रॅफिक आहे. ते लक्षात घेता, खड्ड्यांचं काम करणं शक्य नाही. हे आम्हालादेखील कळतंय… पण हे काही एका रात्रीत झालेलं नाही ना… त्यावरचे तोडगे काढण्यासाठी तुमच्याकडे तज्ज्ञ आणि सल्लागार असणं गरजेचं आहे, असतीलसुद्धा… पण तुम्ही खोटं का बोलता?”

पुढे आस्ताद विशद करतो, “सात दिवसांत रस्ते सुधारणं शक्य नाही. पण, आम्ही तुमचे शत्रू आहोत का? प्रामाणिकपणे सांगा की, तीन महिन्यांचा अवधी द्या. त्यात आम्ही सगळे रस्ते सुधारतो. आम्ही विश्वास ठेवू; पण सात दिवसांत रस्ते सुधारतील हे खोटं का बोलता? आता जनता, नागरिक, मतदार किंवा करदाता इतका भोळाभाबडा आणि मूर्ख नाही. तो तुम्हाला प्रश्न विचारणार. घोडबंदरमधील नागरिक आता रस्त्यावर उतरले आहेत. हळूहळू आंदोलनाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे आणि याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही का? की तुम्हाला वाटतंय; पण काम करू दिलं जात नाहीय. जे काय आहे, ते आमच्याशी खरं बोला ना? तुम्ही जितकं खरं आणि पारदर्शी राहाल, तितकाच आमचा तुमच्यावरचा विश्वास वाढेल…”

आस्ताद काळे इन्स्टाग्राम व्हिडीओ

त्यानंतर तो सांगतो, “हे फक्त तुम्हाला लागू नाही, हे सगळ्याच पक्षातील लोकांना लागू आहे. तुम्ही तुमची कामं नीट करा, ज्यासाठी आम्ही तुम्हाला निवडून दिलं आहे. तसंच या पक्षाच्या सगळ्या समर्थकांना विचारणं आहे की, तुम्हाला या भीषण परिस्थितीचा काही फरक पडत नाही का? कार्यकर्ते किंवा समर्थकांनो… तुमचे नातेवाईक, मित्र, आई-वडील, मुलं, बायकासुद्धा या रस्त्यावरूनच प्रवास करतात. तुम्ही ज्याचे समर्थक आहात, त्याला प्रश्न न विचारणं, असं करू नका. उद्या यात तुमचा जीव गेला तर आणि कोणी तुमची मदत करायला येणार नाही. त्यामुळे एकत्र येऊ.