Aata Hou De Dhingana 3 Winner Updates : ‘आता होऊ दे धिंगाणा’ या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. यंदा या कार्यक्रमात अनेक नवनवीन खेळ आणि कलाकारांची धमालमस्ती पाहायला मिळाली होती. या कार्यक्रमाचा धडाकेबाज सदस्य गेल्यावर्षी स्वत: होस्ट सिद्धार्थ जाधव ठरला होता. त्यामुळे यंदा धडाकेबाज सदस्य कोण ठरणार? ड्रीम कारवर कोण आपलं नाव कोरणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. अखेरीस विजेत्याचं नाव समोर आलेलं आहे.

‘स्टार प्रवाह’च्या ‘थोड तुझं आणि थोडं माझं’ या मालिकेचा नायक तेजस प्रभू म्हणजे समीर परांजपेने यंदा महाअंतिम सोहळ्यात ड्रीम कार मिळवली आहे. नवीकोरी गाडी भेट म्हणून मिळाल्यानंतर अभिनेत्याचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. समीरचे नव्या गाडीबरोबरचे फोटो सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहेत.

नवीन गाडी जिंकल्यावर अभिनेत्याने खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टच्या फोटोंमध्ये शोचा होस्ट सिद्धार्थ जाधव समीरला गाडीची किल्ली भेट देत असल्याचं पाहायला मिळत आहे. समीर लिहितो, “स्टार प्रवाह वाहिनी, सतिश राजवाडे सर, श्रीप्रसाद क्षीरसागर सर, सुमेध म्हात्रे आणि सिद्धार्थ जाधव माझ्या भावा… तुम्ही दिलेल्या Surprise साठी आणि मौल्यवान क्षणांसाठी खूप खूप आभार! तुम्ही मुलगा म्हणून मोठं केलंत, त्यामुळे अंगावर चढलेल्या मूठभर मासासाठी कायम तुम्हा सगळ्यांच्या ऋणात आहे.”

समीरच्या पोस्टवर ऋतुजा बागवे, समृद्धी केळकर, आशुतोष गोखले, अक्षया नाईक, ओमप्रकाश शिंदे या कलाकारांनी कमेंट्स करत समीरवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दरम्यान, ‘आता होऊ दे धिंगाणा’ ( Aata Hou De Dhingana ) तिसऱ्या पर्वाने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला असून, आता या शोच्या जागी शनिवार आणि रविवारी ‘शिट्टी वाजली रे’ हा नवीन कुकिंग शो २६ एप्रिलपासून रात्री ९ वाजता प्रसारित केला जाणार आहे. यामध्ये जेवण बनवणाऱ्या जोड्या प्रेक्षकांना भरभरून मनोरंजन करत असल्याचं पाहायला मिळेल.