Abhijeet Kelkar Share’s A Post About Dadar Kabutarkhana : सध्या मुंबईच्या दादर येथे असलेला कबुतरखाना हा मुद्दा चर्चेत आहे. कबुतरांमुळे परिसरातील रहिवाशांना होणाऱ्या त्रासामुळे बीएमसीकडून यावर बंदी घालण्यात आली आहे. परंतु, काही लोकांनी याला विरोध केला तर काहींनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. अशातच आता मराठमोळ्या अभिनेत्यानेही यावर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
मराठी मालिका, चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला येणारा अभिनेता म्हणजे अभिजीत केळकर. अभिजीत केळकर सोशल मीडियावर सक्रिय असतो व तो अनेकदा सामाजिक विषयांबाबत त्याची प्रतिक्रिया व्यक्त करत असतो. अशातच आता त्याने मुंबईच्या दादर येथील कबुतरखान्याच्या मुद्द्यावर त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. यापूर्वीसुद्धा त्याने याबाबत सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता.
दादरच्या कबुतरखान्याबद्दल मंगलप्रभात लोढांवर अभिजीत केळकरची नाराजी
अभिजीतने आता याबाबत इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. यामधून तो म्हणाला, “मंगलप्रभात लोढा हे स्वत: मुंबईचे पालकमंत्री असूनही, मुंबईकरांच्या आरोग्याचा विचार न करता दादरच्या कबुतरखान्यासंदर्भात महानगरपालिकेला पत्र देतात हे अत्यंत दुर्दैवी आहे.” अभिजीतने कबुतरखान्यामुळे तेथील लोकांना होत असलेल्या त्रासामुळे बीएमसीच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. राज्य सरकारनेही पावसाळी आधिवेशनात बीएमसीला यासंदर्भात योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते.

अभिजीतने रविवारी ३ ऑगस्ट रोजी सोशल मीडियावर या संदर्भात व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला होता. व्हिडीओला कॅप्शन देत अभिनेता म्हणालेला, “काहीच दिवसांपूर्वीचा दादरच्या कबुतरखान्याचा हा व्हिडीओ, हा व्हिडीओ शूट करतानाच माझा भयंकर संताप झाला होता… भूतदया वगैरे सगळं मलाही आहेच, मलाही प्राणी, पक्षी अतिशय प्रिय आहेत पण कबूतर ह्या पक्षांमुळे श्वसनाचे बरे न होणारे गंभीर विकार, आजार होतात हे सिद्ध होऊनही, मुंबई महानगरपालिकेने वारंवार सचेत करूनही, सूचना देऊनही लोकांना अक्कल येत नाही.”
अभिनेता पुढे म्हणालेला, “कबूतर हा पक्षी कुठल्या एका धर्माचा पक्षी त्यांना वाटत असेल तर तो त्यांनी आपल्या घराला जाळ्या लावून, घराच्या आत खुशाल पाळावा… आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी कुठल्याही पक्षाने, निदान ह्याचे तरी धार्मिक राजकारण न करता बीएमसीने जी ताडपत्री, शेड घालून कारवाई केली आहे त्यामागे खंबीरपणे उभे राहावे ही कळकळीची विनंती.” पुढे त्याने बीएमसीला टॅग करत कौतुक केलं होतं.