Bigg Boss Marathi 5 वे पर्व चांगलेच चर्चेत राहिले. या पर्वात स्पर्धकांची झालेली भांडणे, वादविवाद याबाबत तर चर्चा झालीच; पण काही सदस्यांच्या मैत्रीचीदेखील मोठी चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. पंढरीनाथ कांबळे आणि सूरज, अरबाज आणि निक्की, अंकिता आणि धनंजय पोवार यांच्याबरोबर आणखी दोन स्पर्धकांची मैत्री गाजली. ती जोडगोळी म्हणजे निक्की तांबोळी आणि अभिजीत सावंत यांची. बिग बॉसच्या घरात दिसलेल्या या मैत्रीवर आता अभिजीत सावंतने वक्तव्य केले आहे.

काय म्हणाला अभिजीत सावंत?

अभिजीत सावंतने ‘राजश्री मराठी’ला नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला निक्कीबरोबरच्या मैत्रीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. बिग बॉसच्या घरात निक्कीबरोबरची मैत्री चर्चेत होती. चांगलं-वाईट दोन्ही बोललं गेलं. इथून पुढे निक्कीबरोबर मैत्री राहणार आहे का, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना अभिजीतने म्हटले, “बिग बॉसच्या घरात मी माझा रस्ता शोधत होतो. वेगवेगळ्या लोकांबरोबर बसत होतो. सुरुवातीला लोक एकत्र येतात; पण नंतर प्रत्येकाचे विचार समोर येऊ लागतात. कोणाकोणाचे शब्द ऐकल्यानंतर असं वाटायचं की, यांच्याबरोबर जमत नाहीये. त्यावेळी मी निक्कीबरोबर बोलायचो. तिनं आधीदेखील एक शो केलेला आहे. त्याबद्दल ती तिचा अनुभव सांगायची. कधी कधी तात्त्विकदेखील बोलायची. त्यामुळे खूप गोष्टी कळायच्या आणि म्हणून ती मैत्री झाली.”

पुढे बोलताना अभिजीतने म्हटले, “आम्ही एकमेकांना समजायला लागलो. आमचे विचार जुळायला लागले. गेमसाठी काही नव्हतं. गेम खेळायचा, तर मी बी टीममध्ये बसायचो आणि ती ए टीममध्ये असायची. पण जेव्हा टास्क संपायचे, गेम बाजूला केल्यानंतर स्वत:ची मानसिकता चांगली ठेवणं महत्त्वाचं होतं. त्यावेळी तिचा खूप आधार होता. मी आशा करतो की, ही मैत्री पुढेदेखील अशीच राहावी.” अशा पद्धतीने अभिजीत निक्कीबरोबरच्या मैत्रीवर व्यक्त झाला आहे.

हेही वाचा: Bigg Boss Marathi: जान्हवी किल्लेकरला जाऊबाई म्हणाली, “मी घरात येऊन तुला मारलं असतं…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सूरज चव्हाण बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता आणि अभिजीत सावंत उपविजेता ठरला आहे. तर, निक्की तांबोळीला तिसऱ्या स्थानावरून घराबाहेर पडावे लागले. निक्की आणि अभिजीत दोघे वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असूनदेखील त्यांच्यामध्ये चांगली मैत्री झाली होती. आता बिग बॉस नंतरदेखील त्यांची मैत्री अशीच राहणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.