‘बिग बॉस’फेम अभिजीत सावंत सध्या चर्चेत आला आहे. अभिजीतने नुकतीच ‘हिंदी रश’ला मुलाखत दिली. त्यामध्ये त्याने त्याच्याबद्दलचे अनेक किस्से सांगितले आहेत. अभिजीतने या मुलाखतीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलचाही एक किस्सा सांगितला होता. अभिजीत सावंत बेघर अशा वृत्तपत्रात छापून आलेल्या खोट्या बातमीमुळे बाळासाहेबांनी त्याला घरी बोलावलं आणि नवीन घराची ऑफर दिल्याचं त्यानं सांगितलं होतं.
‘हिंदी रश’ला दिलेल्या मुलखतीमध्ये अभिजीतने काही वर्षांपूर्वी त्याचं नाव जोडल्या गेलेल्या एका प्रकरणाबद्दल खुलासा केला आहे. त्यामध्ये अभिजीत म्हणाला, “पोलिस ठाण्यामध्ये मी ज्यांना सोडवायला गेलो होतो, त्यांच्यामुळेच मला तिथे ५ वाजेपर्यंत थांबावं लागलं. आणि तेव्हा अशी बातमी आली की, या लोकांनी दारू पिऊन पैज लावली आणि त्यादरम्यान त्यांच्यामुळे एकाचा अपघात झाला. ते तीन लोकही गायकच होते, जे पुढे निघाले होते आणि त्यांचा तेवढ्यात अपघात झाला. म्हणून त्यांनी मला फोन केल्यावर मी त्यांना शोधत शोधत तिथे पोहोचलो. त्यात त्या चारही मुलीच असल्याने मला आतमध्ये जाणं भाग होतं.”
“मी त्यांना समजावण्याकरता गेलो, तर तिथे लोक माझ्यावर भडकले की, तू दारू पिऊन आला आहेस. मी म्हटलं ठीक आहे. लोक आहेत; गर्दी झालीय, तर बोलणारच. पण मी पोलिस ठाण्याच्या आत गेलो, तर तोवर सगळी मीडियाची मंडळी तिथे उस्थित होती. आणि तेव्हा मला एक वेगळाच अनुभव मिळाला. तेव्हा मला समजलं की, गोष्टी कशा बदलतात. पोलिस ठाण्यामध्ये गेल्यानंतर पोलिसांनी आम्हाला (मला आणि माझ्या एका मित्राला) तिथे बसवलं. आणि पोलिसांनाही माहीत होतं की, आम्ही दारू प्यायलेलो नाही आहोत. कारण- आमच्या चेहऱ्यावरून त्यांना याचा अंदाज आला असणार. तिथे आम्ही एसी रूममध्ये बसलेलो असताना पोलिस एक मुलाला मारत होते आणि तो कोणीतरी चोर होता. तेव्हा पोलिसांनी मला विचारलं की, तुम्ही काही खाणार का? बिर्याणी मागवू का? असं सगळं वातावरण तिथे होतं”, अशी अधिक माहिती अभिजीतने दिली.
त्याबाबत बोलताना पुढे अभिजीत म्हणाला, “तेव्हा तिथे एक माणूस आला आणि म्हणू लागला की, अभिजीत सावंत कोण आहे. बाहेर काढा त्याला. आम्ही त्याला सोडणार नाही. त्यावेळी फक्त मला मारण्यासाठी बाहेर लोकांची गर्दी झाली. तेव्हा मी विचार करीत होतो की हे जग कसं आहे. मी कुठलं भांडणही केलं नव्हतं. ना मी त्या अपघाताच्या वेळी तिथे उपस्थित होतो; पण तरी पूर्ण केस माझ्यावर झाली. तेव्हा मी समजून गेलो की, हे असंच असतं.