‘शुभविवाह’, ‘नवे लक्ष्य’, ‘आई तुळजाभवानी’ या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या मराठी अभिनेत्याने साधारण महिन्याभरापूर्वी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली होती. इन्स्टाग्रामवर हटके व्हिडीओ शेअर करत या अभिनेत्याने तो लवकरच बाबा होणार असल्याचं जाहीर केलं होतं. आता अभिनेत्याने त्याला मुलगा झाल्याची गोड बातमी सर्वांना देत लेकाचं नाव सोशल मीडियावर जाहीर केलं आहे.
लोकप्रिय अभिनेता अभिजीत श्वेतचंद्रच्या घरी लग्नानंतर दोन वर्षांनी चिमुकल्या सदस्याचं आगमन झालेलं आहे. अभिजीतला मुलगा झाला आहे. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच ‘राजश्री मराठी’शी संवाद साधताना मुलगा झाल्याची आनंदाची बातमी सर्वांना दिली होती. याशिवाय अभिनेत्याने बाळाचं नाव काय ठेवायचं यासाठी चाहत्यांकडे खास मदत मागितली होती. आता सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत अभिजीतने लेकाचं नाव व त्याचा अर्थ सर्वांना सांगितला आहे.
अभिजीतने त्याच्या लेकाचं नाव अर्शिव असं ठेवलं आहे. या नावाचा अर्थ सर्वत्र भगवान शिव, शिव स्वरूप असा होतो असं अभिनेत्याने त्याच्या कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. अर्शिवचा जन्म २६ जानेवारीला झाला. यानंतर अभिनेत्याने १ मे रोजी बाळाचं बारसं केलं.
याबद्दल अभिनेता लिहितो, “ॐ नमः पार्वती पतये, हर-हर महादेव! जय शिवराय…तुम्हाला सांगायला आनंद होतोय… महादेवाच्या कृपेने २६ जानेवारी २०२५ म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी आम्हाला पुत्ररत्नाचा लाभ झाला आणि १ मे रोजी म्हणजेच महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून त्याचा नामकरण सोहळा पार पडला. आमच्या पुत्राच नाव आहे… “अर्शिव” ( शिव स्वरूप )अर्शिव सेजल अभिजीत श्वेतचंद्र.”
दरम्यान, अभिजीत श्वेतचंद्र आणि त्याची पत्नी सेजलने २०२३ मध्ये लग्नगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली होती. २४ फेब्रुवारी २०२३ रोजी कुटुंबीय व मित्रपरिवाराच्या उपस्थितीत यांचा विवाहसोहळा पार पडला होता. आता लग्नानंतर दोन वर्षांनी अभिजीत आणि सेजल यांनी आपल्या बाळाचं स्वागत केलं आहे. काही दिवसांपूर्वीच सेजलच्या डोहाळेजेवणाचा कार्यक्रम पार पडला होता. यावेळी अभिनेत्याची पत्नी सुंदर अशी हिरवी साडी आणि त्यावर फुलांचे दागिने घालून तयार झाली होती.