अभिनेता अविनाश सचदेवबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्री पलक पुरसवानी प्रेमात पडली आहे. ती लवकरच लग्न करणार असल्याची माहिती तिने दिली आहे. पलक सध्या मार्केटिंग व रेव्हेन्यू क्षेत्रात काम करणाऱ्या रोहन खन्नाला डेट करत आहे. दोघेही ७ महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत.
पलक एकदा मित्रांबरोबर डिनरला गेली होती, तिथे तिची रोहनशी भेट झाली. “मी माझ्या मित्रांबरोबर एका रेस्टॉरंटमध्ये होते आणि रोहनच्या टेबलावर माझ्या ओळखीच्या एका व्यक्तीला भेटायला गेले होते. तिथे आम्ही थोडं बोललो आणि मला रोहनबद्दल एक स्पार्क जाणवला,” असं पलक म्हणाली.
रोहन व पलकने तेव्हा एकमेकांचे नंबर घेतले नव्हते. त्यानंतर दोन महिन्यांनी रोहनने पलकला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. पलक म्हणाली, “खरं तर मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नव्हतं, पण तरीही मला फक्त त्याचेच विचार येत होते. एके दिवशी मी अचानक मेसेज रिक्वेस्ट तपासल्या, खरंतर मी बघत नाही मेसेज, पण त्यादिवशी काय झालं कुणास ठाऊक. मी पाहिलं की रोहनने मला मेसेज केला होता आणि त्याने मला कॉफीसाठी विचारलं होतं. मला तो मेसेज पाहून खूप आनंद झाला.”
पलकने रोहनचं केलं कौतुक
पलक म्हणाली, “मला जाणवलं की तो खूप आध्यात्मिक, धाडसी आहे. त्याला प्रवास व काम करायला खूप आवडतं. तो मला माझी स्वप्ने पूर्ण करण्यास मदत करतो. मला इंडस्ट्रीबाहेरची व्यक्तीच जोडीदार म्हणून हवी होती. मी चार वर्षे माझ्या डायरीत अशा माणसाबद्दल लिहिलंही होतं. आणि आता सगळं तसंच घडतंय. आयुष्याला अर्थ असल्यासारखं वाटतंय. प्रेमभंग व प्रेमावरून विश्वास उडाल्यानंतर रोहनला भेटणं खूप जादुई होतं.”
केव्हा करणार लग्न?
पलक व रोहन या वर्षाअखेरीस लग्न करणार आहेत. १५ सप्टेंबरपासून डेटिंग करू लागलो. पाच महिन्यांचं रिलेशनशिप असताना त्याने एक सुंदर सरप्राईज देऊन लग्नासाठी विचारलं. आता लग्नासाठी योग्य ठिकाण शोधत असून डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यात लग्न करणार, असं पलकने सांगितलं.
पलक पुरसवानी आधी अभिनेता अविनाश सचदेवबरोबर रिलेशनशिपमध्ये होती. त्यांचा साखरपुडा झाला होता आणि नंतर ते वेगळे झाले. “ते नातं ४ वर्षे टिकलं आणि माझ्यासाठी ते खूप महत्त्वाचं होतं. पण प्रत्येकाच्या आयुष्यात आव्हानं येतात, मीही त्या आ्हानात्मक टप्प्यात निराश होण्याऐवजी माझ्यावर, करिअरवर मेहनत घ्यायचं ठरवलं,” असं पलकने नमूद केलं.
पलक बिग बॉस ओटीटी २ मध्ये सहभागी झाली होती. ती शेवटची ‘दबंगई – मुलगी आयी रे आयी’ मध्ये दिसली होती. तिने चित्रपट व सीरिजमध्ये काम मिळवण्यासाठी टीव्हीवर ब्रेक घेतला आहे. “मी १० वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहे, पण तरीही मला वाटतं की मी अजून शिकायला हवं. मी अलीकडेच माझे कौशल्य वाढविण्यासाठी एक वर्कशॉप केले. मी रिअॅलिटी शोदेखील करेन. पण सध्या माझे लक्ष ओटीटी आणि चित्रपटांमध्ये नवीन सुरुवात करण्यावर आहे,” असं पलक म्हणाली.