Mandar Chandwadkar Show: अभिनयाची आवड असल्याने नोकरी सोडून या क्षेत्रात येऊन संघर्ष करणारे बरेच कलाकार आहेत. असाच एक मराठमोळा अभिनेता आहे, जो लोकप्रिय मालिकेत मराठी व्यक्तीरेखा साकारत आहे. तो दुबईत नोकरी करत होता, पण अभिनयाची आवड असल्याने तो भारतात परतला. तब्बल आठ वर्षे संघर्ष केल्यावर त्याला मालिकेत काम मिळालं आणि गेली १६ वर्षे तो ही भूमिका साकारून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) या मालिकेचे जगभरात चाहते आहेत. या शोची लोकप्रियता इतकी आहे की यातील कलाकारांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. हा शो अनेक वर्षांपासून मनोरंजन करत आहे. या शोमध्ये आत्माराम तुकाराम भिडे ही भूमिका अभिनेता मंदार चांदवडकर (Mandar Chandwadkar) साकारत आहे. संघर्ष करणाऱ्या मंदारचे या शोने नशीब पालटले. कारण तो दुबईतील नोकरी सोडून भारतात परतला होता.
दुबईत नोकरी करत होता मंदार चांदवडकर
टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या एका मुलाखतीत मंदारने सांगितलं होतं की तो दुबईत नोकरी करत होता. “मी मेकॅनिकल इंजिनिअर आहे आणि दुबईत काम करत होतो. पण मी नोकरी सोडून २००० मध्ये भारतात परत आलो. २००८ पर्यंत मी इंडस्ट्रीत खूप संघर्ष केला,” असं मंदार म्हणाला होता. त्याला तब्बल आठ वर्षांनी टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो मिळाला. या शोने त्याला खूप प्रसिद्धी मिळवून दिली. या मालिकेत तो ‘आत्माराम भिडे’ नावाचे पात्र साकारतो, आता त्याला आत्माराम म्हणूनही लोक ओळखतात.
“लोक प्रसिद्ध अभिनेत्यांबरोबर काम करायची स्वप्न पाहतात, पण तारक मेहता शोची लोकप्रियता इतकी आहे की सगळे स्टार्स आमच्या शोमध्ये येतात,” असं मंदार म्हणाला होता.
मंदारने अफवांवर दिलं स्पष्टीकरण
दरम्यान, आतापर्यंत या शोमधील अनेक कलाकारांनी निरोप घेतला. दिशा वकानी, शैलेश लोढा, कुश शाह, गुरुचरण सिंग, जेनिफर मिस्त्री, नेहा मेहता या कलाकारांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने ही मालिका सोडली. आता मंदारनेही मालिका सोडल्याच्या चर्चा सुरू होत्या पण या सर्व निव्वळ अफवा असल्याचं मंदारने स्पष्ट केलं आहे. तो १६ वर्षापासून या शोचा भाग आहे.
अलीकडेच मंदार शो सोडत असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर त्याने प्रतिक्रिया दिली आहे. या सर्व बातम्या खोट्या असल्याचं त्याने म्हटलं आहे. “कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवा पसरवू नका. तारक मेहता का उल्ट चष्मा २००८ पासून सर्वांचे मनोरंजन करत आहे आणि पुढेही करत राहील. मला सर्वांना सत्य सांगायचे होते, म्हणून ही रील शेअर केली,” असं तो म्हणाला.