टीव्ही मालिका, चित्रपट व वेब सीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा अभिनेता म्हणजे रोहित रॉय होय. रोहित हा अभिनेता रोनित रॉयचा भाऊ आहे. रोनितने अभिनेता शरमन जोशीची बहीण मानसी जोशीशी लग्न केलंय. रोनित व मानसी यांना कियारा नावाची मुलगी आहे.
कियारा रॉय उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आहे. एकदा रोहितला त्याच्या मुलीची खूप आठवण येत होती, त्यामुळे त्याने थेट तिला भेटून सरप्राइज द्यायचं ठरवलं. मुलीला भेटण्यासाठी २० तासांचा प्रवास करून रोहित अमेरिकेला गेला. त्याला अचानक दारात बघून मुलीने काय प्रतिक्रिया दिलेली ते जाणून घेऊयात.
एका मुलाखतीत रोहितने मुलीच्या भेटीचा भावुक क्षण सांगितला होता. “मी माझ्या मुलीला सरप्राईज देण्यासाठी अमेरिकेला गेलो होतो. मी तिच्या खोलीच्या दारात पोहोचलो. मला वाटतं त्यादिवशी रविवार होता. सकाळीच मी पोहोचलो, तिने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाली, ‘तू इथे आहेस का?’ भास होत आहे असं समजून ती मला पाहून रडू लागली,” असं रोहितने सांगितलं. कियारा युनिव्हर्सिटीत शेवटच्या वर्षात शिकत असून ती अभ्यासात खूप हुशार आहे, असं रोहित म्हणाला.
तो क्षण रेकॉर्ड न केल्याची खंत
“ती ब्राऊन युनिव्हर्सिटीत शेवटच्या वर्षात शिकत आहे आणि मला तिची फार आठवण येत होती. वडील भावना व्यक्त करत नाहीत, आम्हाला काय वाटतं ते आम्ही कोणालाही काहीही सांगू शकत नाही. मी विचार केला, ‘काय करू?’ मग मी तिकीट काढलं आणि तिला भेटायला गेलो. मी एकटाच होतो. मानसीही (रोहितची पत्नी) काहीच बोलली नाही. मी रात्री पोहोचलो आणि सकाळी टॅक्सी बूक करून तिच्याजवळ गेलो. आम्ही बापलेक सात दिवस एकत्र राहिलो. असे दिवस मी कधीच घालवलेले नाहीत. तो क्षण रेकॉर्ड करण्यासाठी माझ्याकडे कोणीच नव्हतं याची खंत वाटते,” असं रोहित म्हणाला होता.
रोहितला मुलीबरोबरच्या भेटीचे काही क्षण कॅमेऱ्यात रेकॉर्ड करायचे होते, पण नंतर तसं का केलं नाही याबाबत त्याने सांगितलं. “मला वाटलं हल्ली मुलं काहीही बोलतात आणि मला अचानक दारात पाहून ती काही बोलली असती तर? माझा संपूर्ण २० तासांचा प्रवास वाया गेला असता. कियाराला जास्त फोटो आणि व्हिडिओ काढायला आवडत नाहीत,” असं रोहित म्हणाला. तो क्षण रेकॉर्ड केला नसला, तरीही आयुष्यभर आठवणीत राहिल असा मनावर कोरला गेलाय, असं रोहित म्हणाला.