Actress Anushka Sharma Left Mumbai : लोकप्रिय अभिनेत्री अनुष्का शर्माने शिक्षणासाठी ब्रेक घ्यायचं ठरवलं आहे. बालकलाकार म्हणून अभिनयविश्वात आपल्या करिअरची सुरुवात करणारे अनेक कलाकार शिक्षणासाठी ब्रेक घेतात. अनुष्काला शिक्षण पूर्ण करायचंय आहे, त्यासाठी ती मुंबई सोडून एका अरब देशात स्थायिक झाली आहे.
टीव्ही मालिका ‘मोल्क्की’ मध्ये जुही प्रताप सिंहची भूमिका साकारून प्रसिद्ध झालेली टीव्ही अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. १३ वर्षीय अभिनेत्री आता बहरीनला स्थायिक झाली आहे. तिने अभ्यास व स्वतःला वेळ देण्यासाठी अभिनयाच्या करिअरमधून तात्पुरता ब्रेक घेतला आहे.
मी मुंबई सोडली – अनुष्का
अनुष्का तिच्या निर्णयाबद्दल ई-टाइम्सशी बोलताना म्हणाली, “मी मुंबई सोडली आहे. सध्या मी बहरीन या अरब देशात राहतेय. मी काही वर्षांसाठी अभिनयातून एक ब्रेक घेत आहे, कारण मी सध्या माझ्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आहे. पण याचा अर्थ मी अभिनय सोडत आहे, असा नाही.”
अनुष्का सध्या भारतीय टेलिव्हिजनपासून दूर असूनही तिचं अभिनयावरील प्रेम अजूनही कायम आहे. “मला अभिनयाची आवड आहे आणि कॅमेऱ्यासमोर राहायला मला खूप आवडतं. पण कधीकधी, आपल्या भविष्यासाठी आपल्याला आयुष्यात काही कठीण निर्णय घ्यावे लागतात. मी इथे आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्स आणि चित्रपटांसाठी ट्राय करत राहीन,” असं अनुष्काने नमूद केलं.
बहरीनमध्ये अनुष्काने नव्याने सुरुवात केली आहे. एका नवीन देशात येऊन नवीन लोकांशी कनेक्ट होऊन आनंद वाटतोय, असं अनुष्काने सांगितलं. “मी येथे एंजॉय करतेय. मी नवीन लोकांशी संवाद साधतेय, नवीन मित्र बनवत आहे. येथील लोक दयाळू, नम्र आणि खूप चांगले आहेत. जेव्हा लोक मला भेटतात आणि मी अभिनेत्री आहे हे त्यांना माहीत असतं, ते मला ओळखतात हे पाहून आणि त्यांचं प्रेम पाहून मला खूप छान वाटतं,” असं अनुष्का म्हणाली.
१३ वर्षांची अनुष्का म्हणते की आता तिच्यावरील जबाबदाऱ्या वाढल्यात असं तिला वाटतं. “हा नवीन प्रवास आहे. मला संपूर्ण स्वातंत्र्यासह मोठं व्हायचंय, असं मला कायम वाटायचं, पण आता मला माझ्या जबाबदाऱ्यांच्या जाणीव आहे,” असं तिने सांगितलं.
अनुष्का शर्माच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने ‘नागिन 6’ व ‘प्रोफेसर पांडे के पांच परिवार’ या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या होत्या.