Daljeet Kaur Allegations On Ex Husband Nikhil Patel : टीव्ही अभिनेत्री दलजीत कौर अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे आणि या चर्चा होण्याचं कारण म्हणजे तिचं लग्न. पहिल्या लग्नात अपयश आल्यावर तिने दुसऱ्यांदा विवाहगाठ बांधली. मात्र, दलजीतचं दुसरं लग्नही अवघ्या वर्षभरातच मोडलं.
अभिनेता शालीन भनोतशी दलजीतचं पहिलं लग्न झालं होतं. यानंतर तिने उद्योजक निखिल पटेलबरोबर दुसऱ्यांदा लग्न केलं. लग्नानंतर ती परदेशात निखिलबरोबर राहू लागली. पण आठ महिन्यांतच त्यांचं हे नातं तुटलं. निखिल पटेलबरोबरच्या नात्याबद्दल दलजीतने याआधी अनेकदा तिची प्रतिक्रिया दिली आहे. अशातच आता पुन्हा दलजीतने निखिलवर गंभीर करत त्याच्याकडून माफीनामाही मागितला आहे.
The Free Press Journal ला दिलेल्या मुलाखतीत विभक्त झाल्यानंतर तिला किती भावनिक तणाव आणि मानसिक यातना सहन कराव्या लागल्या, याबद्दल आपलं दुःख व्यक्त केलं. तसंच निखिलच्या वर्तणूकीबद्दल ती आता शांत बसणार नसून मी त्याच्या माफीनाम्याची वाट पाहतोय असंही दलजीत म्हणाली.
या मुलाखतीत दलजीत म्हणाली, “माझं लग्न झालं तेव्हा मी खूप आनंदी होते. पण जेव्हा ते मोडलं, तेव्हा मनात खूप राग आणि खंत होती. निखिलला हे समजायला हवं की, मी आता शांत बसणार नाही. मे माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत लढणार. कोणालाही अशाप्रकारे वागवणं योग्य नाही. आजही मी त्याच्या माफीनाम्याची वाट पाहतेय. तो माफी मागत नसेल, तरी मी शेवटपर्यंत लढेन.”
याबद्दल दलजीत पुढे असं म्हणते, “तुम्ही लग्न करून, नवरा म्हणून समारंभात सहभागी होऊन नंतर ‘हे लग्न झालंच नाही’ असं म्हणू शकत नाही. त्यामुळे मला आता त्याच्याकडून माफी हवी आहे आणि मी ती माफी मिळवणारच. यासाठी मी अगदी पुरुषासारखी लढेन.”
दरम्यान, मार्च २०२३ मध्ये भारतात पारंपरिक पद्धतीने दलजीत आणि निखिल यांचं लग्न झालं होतं. त्यानंतर दलजीत पती आणि मुलासह केनियाला गेली. मात्र, काही महिन्यांतच ती मुलासह भारतात परतली आणि त्यानंतर निखिलवर मानसिक छळाचे आरोप केले.
यानंतर निखिलने दिलेल्या वक्तव्यात असं म्हटलं की, केनियामधील कायद्यांनुसार त्याचं आणि दलजीतचं लग्न वैधच नव्हतं आणि भारतातला विवाह हा केवळ एक ‘सांस्कृतिक सोहळा’ होता. या सगळ्या दरम्यान, निखिल मुंबईत सेफिना नझार या एका महिलेबरोबर स्पॉट झाल्याचंही पाहायला मिळालं.