‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचं नाव घेतलं की सर्वांच्याच डोळ्यासमोर पटकन नम्रता संभेराव येते. या कार्यक्रमाने तिला नवी ओळख दिली. आज तिचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. नम्रता हे सोशल मीडियावर सक्रिय राहून चाहत्यांच्या संपर्कात असते. तिच्या आयुष्यात काय सुरू आहे हे ती विविध पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांची शेअर करत असते. आता तिने तिच्या आईबद्दलचा तिचा प्रेम एका पोस्टमधून व्यक्त केलं आहे.

नम्रताच्या आईचा आज वाढदिवस आहे आणि यानिमित्त तिने त्या दोघींचा एक फोटो शेअर करत तिची आई कशी आहे हे सर्वांना सांगितलं. याचबरोबर तिने तिच्या आईला एक वचनही दिलं. तिने लिहिलं, “हॅपी बर्थडे यंग लेडी… माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी सपोर्ट सिस्टिम माझी मम्मी. बालवाडीत असताना नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता तेव्हा मम्मीने मला ‘सनईचा सूर’ ह्या गाण्यावर डान्स बसवून दिला. अजूनही मी नाही विसरू शकत. मला मम्मी स्टेप्स शिकवत होती. तेव्हा मम्मी ज्या तालात नाचत होती त्याच तालात तिची लांबसडक वेणी डुलत होती…. सुंदर दिसायची तेव्हाही…माझ्या मम्मीमुळे मी ह्या क्षेत्रात येऊ शकले हे तितकच खरं.”

आणखी वाचा : “ताई, खूप खूप धन्यवाद…”; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’फेम नम्रता संभेरावने मानले विशाखा सुभेदारचे आभार, जाणून घ्या कारण

पुढे ती म्हणाली, “सगळे मला विचारतात आप क्या खाते हो? त्याचं गूढ माझी मम्मी. तिला हे सगळं येत डान्स, गाणं, अभिनय, स्वयंपाक..तिच्यातला भावनिक भाव मी कट टू कट उचललाय. पूर्वी जेव्हा छोटे मोठे रोल करायचे तेव्हा माझ्यासोबत प्रवास दिवसभर, दिवसभर थांबायची, माझ्या इतकाच तिचा स्ट्रगलही मोठा आहे, जिद्द, महत्वाकांक्षा, उत्साह, आशा, मेहनत, माया मम्मीकडून मिळाली आणि मी ती कायम जपून ठेवीन. माझ्या आयुष्यातलं तुझं स्थान अव्वल आहे. एक सांगू, माझी मम्मी पण जरा मस्तीखोर आहे. कधी गप्पा मारताना मला भानच रहात नाही मम्मीशी गप्पा मारतेय की मैत्रिणीसोबत. तिने स्वतःचे निर्णय, अपेक्षा कधीच लादल्या नाहीत. आम्ही जे करू त्यात सपोर्ट करणारी माझी मम्मी किती आणि काय सांगू!!”

हेही वाचा : Video: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम नम्रता संभेराव करणार वेब सिरीजमध्ये पदार्पण, डार्क कॉमेडी ‘गेमाडपंथी’चा ट्रेलर प्रदर्शित

शेवटी तिने लिहिलं, “एवढ्याश्या शब्दात तिचं वर्णन नाही होऊ शकत. पण आज काही मोजक्या जुन्या आठवणींना उजाळा द्यावासा वाटला आय लव्ह यू माय मम्मी ! तर अशी माझी मम्मी लाखात एक आहे. ती बेस्ट आई, बायको, सासू, मैत्रीण आणि आज्जी आहे आणि आत्ता जसं वय पुढे सरकतंय तशी ती दिवसेंदिवस तरुण होत चालली आहे मनाने आणि मला ते खूप आवडतंय. मम्मी तुझ्यामुळे माझं अस्तित्व आहे. मला तुझ्या पोटी जन्म दिलास आणि इतकं मेहनती बनवलंस मी आयुष्यभर ऋणी आहे. मी तुझी मान अशीच उंचावत ठेविन प्रॉमिस.”