Prajakta Gaikwad Engagement : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतून घराघरांत लोकप्रिय झालेल्या अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने काही दिवसांपूर्वीच लग्न ठरल्याचं जाहीर केलं होतं. सोशल मीडियावर “ठरलं! कुंकवाचा कार्यक्रम” अशी पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने तिच्या सगळ्या चाहत्यांना गूडन्यूज दिली होती. आता अभिनेत्रीच्या घरी तिच्या साखरपुड्याची तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
प्राजक्ता गायकवाडने साखरपुड्यानिमित्त हातावर सुंदर मेहंदी काढली आहे. याचा व्हिडीओ शेअर करत अभिनेत्रीने तिचा साखरपुडा उद्या ( ७ ऑगस्ट २०२५ ) असल्याचं सांगितलं आहे. अभिनेत्रीने तिच्या हातावरच्या सुंदर मेहंदीची झलक व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांना दाखवली आहे. याला प्राजक्ताने, “सुरुवात झाली…साखरपुड्याला फक्त एक दिवस बाकी” असं कॅप्शन दिलं आहे.
प्राजक्ताच्या हातावरील मेहंदीच्या सुंदर डिझाईनने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मुलगा मुलीच्या हातात गुडघ्यावर बसून अंगठी घालतोय असं चित्र प्राजक्ताच्या तळहातावर रेखाटण्यात आलं आहे. याशिवाय मेहंदीत ‘Love’ असं इंग्रजीत लिहिलं असून, रिंग सेरेमनीचा केक, अंगठ्या याची झलकही तिच्या मेहंदीत पाहायला मिळतेय.
प्राजक्ताच्या मेहंदीच्या डिझाईनमध्ये दोन अंगठ्या असल्याचं पाहायला मिळतंय. यातील एका अंगठीत ‘S’ हे अक्षर तर, दुसऱ्या अंगठीत ‘P’ हे अक्षर लिहिण्यात आलं आहे. अभिनेत्रीने अद्याप तिच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दल कोणताच खुलासा केलेला नाहीये. त्यामुळे ही मेहंदी डिझाईन पाहून प्राजक्ताच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव S अक्षरावरून सुरू होणारं आहे, हे स्पष्ट झालं आहे.
अभिनेत्रीने शेअर केलेल्या आणखी एका स्टोरीमध्ये, मेहंदी सोहळ्यात तिच्या होणाऱ्या पतीने प्राजक्ताचं नाव लिहून त्याखाली फुलांची डिझाइन काढून घेतल्याचं पाहायला मिळत आहे. आता साखरपुडा समारंभाचे फोटो समोर आल्यावर अभिनेत्रीचा होणारा नवरा नेमका कोण आहे याचा उलगडा होईल.

दरम्यान, प्राजक्ता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमुळे सर्वत्र लोकप्रिय झाली. तिने यामध्ये महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली होती. आतापर्यंत तिने ‘नांदा सौख्य भरे’, ‘संत तुकाराम’, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘आई माझी काळुबाई’ या मालिकांमध्ये काम केलं आहे.