लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठेचं वयाच्या अवघ्या ३८ व्या वर्षी निधन झाल्याने संपूर्ण मराठी कलाविश्वावर शोककळा पसरली आहे. ‘चार दिवस सासूचे’, ‘या सुखांनो या’, ‘पवित्र रिश्ता’, ‘बडे अच्छे लगते है’ अशा अनेक मालिकांमध्ये तिने महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. कर्करोगाशी झुंज अपयशी ठरल्याने रविवारी सकाळी ( ३१ ऑगस्ट ) अभिनेत्रीची प्राणज्योत मालवली.

प्रिया मराठेने मीरा रोड येथील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. ती गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होती. प्रिया गेल्यावर्षापासून सोशल मीडियावर सुद्धा सक्रिय नव्हती. ११ ऑगस्ट २०२४ रोजी तिने शेवटची पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने पती शंतनूबरोबरचा फोटो शेअर केला होता. प्रियाच्या आठवणीत अनेक मराठी कलाकारांनी भावनिक पोस्ट शेअर केल्याचं पाहायला मिळत आहे.

‘नवरी मिळे हिटलरला’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारी अभिनेत्री शर्मिला शिंदे ज्यावेळी कामासाठी मुंबईत आली, तेव्हा सर्वप्रथम ती प्रिया मराठेला तिच्या घरी जाऊन भेटली होती. तेव्हाची आठवण शर्मिलाने तिच्या पोस्टमध्ये सांगितली आहे.

शर्मिला शिंदेची पोस्ट

शर्मिला लिहिते, “Rest In Peace प्रिया असा बोलताना पण असं एका क्षणात सगळं कसं संपू शकतं हा विचार मनात येतोय. मी मुंबईमध्ये नवीन होते… अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी पहिल्यांदा मुंबईला आले होते. तेव्हा नुकतंच मला पहिलं काम मिळालं होतं. त्यावेळी आयुष्यात पहिल्यांदा मी मुंबईमध्ये एका अभिनेत्रीच्या घरी गेले होते. ती अभिनेत्री तू होतीस… माझा एक मित्र मला तुझ्या घरी घेऊन आला होता. तू तेव्हा अंधेरीला तुझ्या काही मैत्रिणींबरोबर राहत होतीस. एवढ्या वर्षात ती आपली भेट मी कधीच विसरले नव्हते आणि यापुढे सुद्धा कधीच विसरणार नाही… आपली पुढची भेट होईपर्यंत स्वत:ची काळजी घे आणि जशी होतीस तशीच राहा. छान, हसतमुख आणि एक उत्तम माणूस.”

दरम्यान, प्रियाच्या अकाली निधनाने चाहत्यांना सुद्धा खूप मोठा धक्का बसला आहे. प्रियाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झाल्यास, प्रिया आणि शंतनू यांनी २०१२ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यांनी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत एकत्र कामही केलं होतं.