आईच्या निधनानंतर राखी सावंतने किरण मानेंना केलेला फोन; अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला “ओक्साबोक्शी रडणाऱ्या...” |actress rakhi sawant mother died kiran mane shared special post | Loksatta

आईच्या निधनानंतर राखी सावंतने किरण मानेंना केलेला फोन; अभिनेता पोस्ट शेअर करत म्हणाला “ओक्साबोक्शी रडणाऱ्या…”

राखी सावंतच्या आईचं २८ जानेवारीला निधन झालं.

kiran mane post for rakhi sawant
राखी सावंतसाठी किरण मानेंची पोस्ट. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मॉडेल व अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांचं २८ जानेवारीला निधन झालं. त्या अनेक दिवसांपासून आजारी होत्या. कॅन्सरग्रस्त असलेल्या राखीच्या आईवर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु, अखेर त्यांची झुंज संपली. आईचं निधन झाल्यानंतर राखीला शोक अनावर झाला होता. राखीने आईचं निधन झाल्यानंतर ‘बिग बॉस मराठी’ फेम किरण मानेंना फोन केला होता.

किरण मानेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन राखीचा फोटो शेअर करत एक पोस्ट लिहिली आहे. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातील राखी सावंतबरोबरचा फोटो किरण मानेंनी शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी आईचं निधन झाल्यानंतर राखीचा फोन आल्याचं म्हटलं आहे.

हेही वाचा>> “देशाने फक्त खान आणि मुस्लीम अभिनेत्री…”, कंगना रणौतने ‘पठाण’वरुन केलेल्या ट्वीटला उर्फी जावेदचं उत्तर, म्हणाली “हिंदू कलाकार…”


“माने, माझी आई गेली. माझा आधार गेला. मी पोरकी झाले…तुम्हाला माहीत आहे, माझी आई माझ्यासाठी सर्वस्व होती..मी काय करू आता???” ओक्साबोक्शी रडणार्‍या राखीचे एकेक शब्द माझ्या काळजात कालवाकालव करत होते…जवळचा मित्र म्हणून फोनवरुन सांत्वन करण्याव्यतिरिक्त मी काहीही करू शकत नव्हतो. खूप हताश झाल्यासारखं वाटलं. आपल्या मैत्रीणीवर दु:खाचा पहाड कोसळलाय आणि आपण तिच्यासाठी काहीच करू शकत नाही ही हतबलता मनाला घेरून टाकत होती…

‘बिग बॉस’च्या घरात विकास आणि तेजस्विनीनंतर माझी खर्‍या अर्थानं कुणाशी मैत्री झाली असेल तर ती राखी सावंतशी! जे कारण विक्याशी मैत्री होण्याचं होतं तेच राखीशी…विपरीत परीस्थितीचा पहाड भेदून उगवून येणारे अंकुर मनापासून भावतात…वरळीतल्या अतिशय गरीब घरात लहानाची मोठी झालेली एक मुलगी वडिलांचा प्रचंड विरोध असूनही बॉलिवूडमध्ये यायचं स्वप्न बघते. पण पोरीची जिद्द आई ओळखते. आपला सगळा सपोर्ट मुलीला देते. तिच्यासोबत घराबाहेर पडते आणि तिला सांगते, “लढ तू. मी आहे खंबीर तुझ्यासोबत.”

छोटं-मोठ्ठं कसं का असेना, पण राखीनं बॉलिवूडमध्ये स्वत:चं स्थान निर्माण केलं. हे करताना ती एक विसरली नाही की आईचा आधार नसता तर आपण इथे नसतो. राखीनं शेवटपर्यंत आईची मनापासून सेवा केली. शेवटच्या कॅन्सरच्या काळात तर आईला तिनं फुलासारखं जपलं.

राखी, तू बिग बॉसमध्ये माझ्याशी अगदी निरपेक्ष, निर्भेळ, नितळ मैत्री केलीस. ती शेवटपर्यंत जपलीस. आपण एकदा गप्पा मारत बसलो होतो. मी तुला एक शेर ऐकवला. “घर में धन, दौलत, हिरे, जवाहरात सब आए…लेकिन जब घर में माँ आयी, तब खुशियां आयी!” तू अचानक रडायला सुरूवात केलीस. आईच्या आठवणीनं व्याकूळ झाली होतीस तू. राखी, सगळ्यात मोठं, वेदनादायी दु:ख कुठलं असेल तर डोक्यावरून आईची सावली दूर होण्याचं. आम्ही किती आणि कसं सांत्वन करणार तुझं??? तुलाच खंबीरपणे यातून बाहेर पडावं लागेल. पण मला एक माहीतीये राखी, आईनंतर तुझ्या सगळ्यात जवळचं कोण असेल तर तो तुझा देव. त्या देवाजवळ गेलीय हे मनात ठेव. तिथे आता ती कायम ‘महफ़ूज़’ आहे! मी पाहिलंय, रोज डोळे मिटून मनापासून प्रार्थना करतेस तू. त्यावेळी आता तुला देवासोबत आईही दिसेल, भेटेल. तू तिच्याशी खूप बोलू शकशील. हसवू शकशील तिला. तुझ्या खुश रहाण्यातच तिचा आनंद आहे, हे लक्षात ठेव. आम्ही जिवलग मित्र आहोतच तुझ्यासोबत. लब्यू राखी.

हेही वाचा>> Video: मन्नतबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी, शाहरुख खान व्हिडीओ शेअर करत म्हणाला “पठाणच्या घरी…”

‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात राखी सावंत व किरण माने यांच्यात घट्ट मैत्री झालेली पाहायला मिळाली. त्यांची मैत्री प्रेक्षकांनाही भावली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-01-2023 at 13:30 IST
Next Story
‘वेड लावलंय’वर अपूर्वा नेमळेकरचा धम्माल डान्स, व्हिडीओ शेअर करत म्हणाली…