‘बाजीगर’मध्ये शाहरुख खानबरोबर काम करणारी रेशम टिपणीस ही लोकप्रिय अभिनेत्री आहे. रेशमने आतापर्यंत अनेक हिंदी तसेच मराठी चित्रपट व मालिकांमध्ये काम केलं आहे. रेशम टिपणीस घटस्फोटित आहे. तिला एक्स पती अभिनेता संजीव सेठपासून एक मुलगा व एक मुलगी अशी दोन अपत्ये आहेत. नुकतीच रेशमच्या मुलाबद्दल एक बातमी आली, त्यावर तिने संताप व्यक्त केला आहे.

रेशम टिपणीसच्या मुलाने इमारतीच्या ५१ व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यावर रेशमने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच मुलाच्या निधनाच्या बातम्या पसरवणाऱ्यांवर रेशमने नाराजी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मुलगा नववीत शिकत होता. तो त्याच्या आईबरोबर सी ब्रूक इमारतीत ५१ व्या मजल्यावर राहत होता. या मुलाच्या आत्महत्येनंतर अनेकांनी हा १४ वर्षांचा मुलगा अभिनेत्री रेशम टिपणीसचा मुलगा असल्याचा दावा केला. पण रेशमने या या खोट्या अफवांवर संताप व्यक्त केला आहे.

रेशम टिपणीस काय म्हणाली?

रेशमने सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका पोस्टवर कमेंट केली आहे. “कृपया याकडे दुर्लक्ष करा. कोणीतरी माझा मुलगा मानवबद्दल खोट्या बातम्या पसरवत आहे. बाप्पाच्या आशीर्वादाने तो बरा आणि सुदृढ आहे. पण ज्या कुणी त्याच्याबद्दल ही खोटी बातमी पसरवली आहे, तो नक्कीच तुरुंगात जाईल. जर कोणी मला खोट्या बातम्या पसरवणाऱ्याला शोधण्यास मदत करू शकत असेल तर प्लीज कमेंट करा,” असं रेशम टिपणीसने म्हटलंय.

resham tipnis
रेशम टिपणीस व तिची मुलं (फोटो – इन्स्टाग्राम)

रेशम टिपणीसने सोशल मीडियावर कमेंट करून तिच्या मुलाबद्दलची बातमी खोटी असल्याचं स्पष्ट केलं आहे. तिच्या या स्पष्टीकरणाने चाहत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. खोट्या बातम्या येत असल्याने रेशमने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा तिने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बुधवारी संध्याकाळी कांदिवली पश्चिम येथे एक दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर रेशम टिपणीसच्या मुलाबद्दलचा हा सगळा गोंधळ सुरू झाला. आत्महत्या करणाऱ्या मुलाची आई लोकप्रिय टीव्ही अभिनेत्री आहे. ती घटस्फोटित आहे आणि एकुलत्या एक मुलाबरोबर वेगळी राहते, असं म्हटलं जात होतं. मुलगा मानसिक तणावाखाली होता का, याचा तपास आता पोलीस करणार आहेत. पण या मुलाच्या आत्महत्येची बातमी आल्यावर तो रेशम टिपणीसचा मुलगा असल्याचं म्हटलं जाऊ लागलं. पण या फक्त अफवा असल्याचं रेशमने स्पष्ट केलं आहे.