Rutuja Bagwe New Business Starts Restaurant : मराठी कलाविश्वातील अनेक अभिनेत्रींनी गेल्या काही वर्षांत नवनवीन बिझनेस सुरू केल्याचं पाहायला मिळालं आहे. अक्षया देवधर, श्रेया बुगडे, सई ताम्हणकर, प्राजक्ता माळी, रेश्मा शिंदे, प्रिया बापट यांच्या पाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवलं आहे. या अभिनेत्रीचं नाव आहे ऋतुजा बागवे. तिने नुकतंच स्वत:चं नवीन हॉटेल सुरू केलं आहे.
ऋतुजा बागवे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. साधारण दोन वर्षांपूर्वी अभिनेत्रीने ठाण्यात स्वत:चं पहिलं घर खरेदी केलं होतं. आता ऋतुजाने व्यवसाय क्षेत्रात पाऊल ठेवत एक नवीन सुरुवात केली आहे. ऋतुजाच्या नवीन रेस्टॉरंटच्या उद्घाटन सोहळ्याला लोकप्रिय अभिनेता सुबोध भावे व त्याची पत्नी देखील उपस्थित होती.
ऋतुजा बागवेच्या नव्या हॉटेलचं नाव काय?
ऋतुजा बागवेने अंधेरी पूर्व, मरोळ परिसरात तिचं नवीन रेस्टॉरंट सुरू केलं आहे. अभिनेत्रीच्या नव्या हॉटेलचं नाव खूपच खास आहे. ऋतुजाने नुकतीच “आयुष्यात पुढचं पाऊल टाकतेय” अशी इन्स्टाग्राम स्टोरी शेअर केली होती. यावरूनच अभिनेत्रीने तिच्या नव्या रेस्टॉरंटचं नाव ठेवलं आहे. तिच्या नव्या हॉटेलचं नवा आहे ‘फूडचं पाऊल’. याठिकाणी खवय्यांना व्हेज व नॉन व्हेज अशा दोन्ही पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

ऋतुजाने तिच्या नव्या रेस्टॉरंटची पहिली झलक चाहत्यांना व्हिडीओच्या माध्यमातून दाखवली आहे. हार्दिक जोशी, सोनाली खरे, अश्विनी महांगडे, शर्मिला शिंदे, हर्षदा खानविलकर, प्राजक्ता गायकवाड, पूर्वा कौशिक, माधुरी पवार, केतकी विलास अशा अनेक कलाकारांनी अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव करत दिल्या नव्या व्यवसायासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ऋतुजाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं झालं, तर काही महिन्यांपूर्वीच तिने ‘माटी से बंधी डोर’ या हिंदी मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती. याशिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘अंधारमाया’ सीरिजमध्ये तिने महत्त्वपूर्ण साकारल्याचं पाहायला मिळालं आहे. ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेमुळे ऋतुजाला घराघरांत लोकप्रियता मिळाली होती. आजवर तिने नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये काम केलं आहे.