Snehlata Vasaikar : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई’ अशा विविध ऐतिहासिक मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली लोकप्रिय अभिनेत्री म्हणजेच स्नेहलता वसईकर. ती ‘बिग बॉस मराठी’मध्ये देखील सहभागी झाली होती. अभिनेत्रीचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

स्नेहलता वसईकर गेल्या काही महिन्यांपासून सन मराठी वाहिनीवरील ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत होती. आता नुकतीच तिने या मालिकेतून एक्झिट घेतली आहे. तिने साकारलेल्या माईसाहेबांच्या भूमिकेसाठी आता कोणाची वर्णी लागलीये जाणून घेऊयात…

सन मराठी वाहिनीवर यंदा १४ जुलै रोजी ‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली. या मालिकेत लोकप्रिय अभिनेता अशोक फळदेसाई व अभिनेत्री अनुष्का गीते हे दोघं प्रमुख भूमिका साकारत आहेत. यांच्यासह अभिनेत्री स्नेहलता वसईकर या मालिकेत ‘माईसाहेब’ या दमदार, डॅशिंग भूमिकेत झळकत होती. माईसाहेब हे पात्र प्रेक्षकांच्या सुद्धा पसंतीस उतरलं होतं. मात्र, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोवरून स्नेहलताने मालिकेचा निरोप घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

‘तुझ्यासाठी तुझ्यासंगं’ या मालिकेत माईसाहेबांच्या भूमिकेसाठी आता लोकप्रिय अभिनेत्री शीतल क्षीरसागरची एन्ट्री झालेली आहे. शीतलने यापूर्वी ‘का रे दुरावा’, ‘नवरी मिळे हिटलरला’, ‘रमा राघव’ अशा गाजलेल्या मालिकांमध्ये काम केलेलं आहे.

नव्या माईसाहेबांच्या एन्ट्रीचा प्रोमो सन मराठीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रेक्षकांनी “जुन्या माईसाहेबांना का बदललं?” असे प्रश्न कमेंट्समध्ये विचारले आहेत. दरम्यान, ही मालिका सन मराठी वाहिनीवर रात्री ९:१५ वाजता प्रसारित केली जाते.